Breaking News

कचर्‍यापासून कम्पोस्टिंग करुन शून्य कचरा अभियान राबवावे - खरमाळे


नगर । प्रतिनिधी -
शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे एकीकडे कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे, तर दुसरीकडे स्वच्छतेसाठी शासन स्वच्छता अभियान राबवित आहे. पण या सगळ्याच्या मुळाशी असलेल्या कचर्‍याची समस्या सुटताना दिसत नाही. ती सुटायची असेल तर प्रत्येक घर, संस्था, वसाहती, सोसायट्यातील रहिवाशांनी कुटुंबात निर्माण ओला कचरा व बागेतील पालापाचोळ्याद्वारे कम्पोस्टिंग करुन शून्य कचरा अभियान राबवायला हवे, असे प्रतिपादन गच्चीवरील माती विरहित बाग अर्थात जीव्हीएमबी (ॠतचइ) व्हाटस्अप अहमदनगरचे समूह प्रशासक जयंत खरमाळे यांनी केले.

गच्चीवरील माती विरहित बाग या व्हॉटस् अ‍ॅप समूहाची ‘कम्पोस्ट प्रक्रिया’ या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच समूह प्रशासक खरमाळे यांच्या सावेडीतील निवासस्थानी पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ बागप्रेमी व शासकीय रुग्णालयातील निवृत्त अधिकारी सुधाकर झांबरे यांच्या हस्ते एका रोपाची लागवड व त्याला पाणी देऊन करण्यात आले. याप्रसंगी शहर, उपनगर व जिल्ह्यातील बागप्रेमी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. खरमाळे पुढे म्हणाले, बागकामाशी निगडीत गच्चीवरील माती विरहित बाग हा फेसबुक समूह पुण्यात प्रमोद तांबे यांनी स्थापन केला तेथून या चळवळीला प्रारंभ झाला. ही चळवळ सर्वव्यापी व्हावी म्हणून या समूहाच्या जिल्हा व तालुकानिहाय शाखा निर्माण करण्यात आल्या, या अंतर्गत ॠतचइ अहमदनगर हा व्हॉटस् अ‍ॅप समूह नगरमध्ये कार्यरत आहे. या समूहात 150 च्यावर बागप्रेमी जोडलेले आहेत. या सदस्यांनी आपल्या कचर्‍याचे व्यक्तिगत पातळीवर व्यवस्थापन करावे, कुटुंबात जमणार्‍या ओल्या कचर्‍यापासून कम्पोस्ट करुन त्या कचर्‍यापासून खतनिर्मिती करावी व आपली बाग फुलवावी या विचारातून ‘कम्पोस्ट प्रक्रिया’ याबाबत प्रात्यक्षिकासह माहितीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ओला कचरा, वाळलेला पालापाचोळा, गावरान गायीच्या शेणाची स्लरी हे एका हवा खेळती राहील, अशा प्लास्टीकची बादली, ड्रम, क्रेटमध्ये थरावर थर देत गेल्यास महिन्यानंतर किळस केल्या जाणार्‍या कचर्‍याचे सोन्यासारखे खत तयार होते. हे खत बागकामच नाही तर शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. यामुळे कोणतेही रासायनिक खत, किटकनाशकाची गरज लागत नाही. याद्वारे विष व रसायनमुक्त बाग आपण फुलवू शकतो. यातून एकाचवेळी कचरा व्यवस्थापन व बागनिर्मिती अशा दोन आनंददायी बाबींचा लाभ मिळतो. असे हे शून्य कचरा अभियान राबवायला जीव्हीएमबी अहमदनगरसमवेत नगरकरांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही खरमाळे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी श्रीरामपूरचे संजय नरोटे यांनी गच्चीवरील बाग कशी फुलवावी याविषयी, तर प्रकाश बीडकर यांनी पाण्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. त्यानंतर खरमाळे परिवाराची बाग सौ.किरण खरमाळे यांनी दाखवली. अल्पोपहार व त्यानंतर विविध रोपांच्या बिया, रोपे व छाटणी केलेल्या फांद्यांची देवाणघेवाण मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी समूह सहप्रशासक सुहासिनी जोशी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
समूह सहप्रशासक तृप्ती गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.