Breaking News

देशातील सर्वांत लांब पुलाचे 25 ला लोकार्पण


नवी दिल्ली: लांबीबाबत आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाचा आणि देशातील सर्वांत लांब पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या पुलावरून रेल्वे आणि वाहने जावू  शकणार आहेत. प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबरला लोकार्पण होणार आहे. 
एच. डी. देवगौडा यांनी पंतप्रधान असताना या सर्वात लांब पुलाची पायाभरणी केली होती. 1997 मध्ये पायाभरणी समारंभ झालेल्या या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सुरुवात झाली. या सर्वांत लांब पुलाचे नाव बोगीबील पूल असे आहे. या पुलावर तीन पदरी रस्ता बांधण्यात आला आहे. त्याखाली दुहेरी रेल्वेमार्ग करण्यात आला आहे. हा पुल ब्रम्हापुत्र नदीवर 32 मीटर उंच बांधण्यात आला आहे. हा पुल स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणार्‍या पुलाच्या धर्तीवर आहे. तेथूनच या पुलाची संकल्पना पुढे आली. या पुलाची लांबी 4.94 किलोमीटर इतकी आहे.
चीनला लागून सीमेवर असलेल्या या पुलाला सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय महत्त्व आहे. हा पूल आसामधील दिब्रूगडला ढेमाजी जिल्ह्यातून जोडला जाणर आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारसाठी हा पूल विकासाचे प्रतीक आहे. चीनच्या सीमेवर असणार्‍या भारतीय लष्कराला रसद पोहचवण्याच्या दृष्टीने हा पूल अतिशय महत्त्वाचा आहे. चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र दलांना तेजपूरहून युद्धसामग्री पोहोचविण्यासाठी हा पूल महत्त्वाचे योगदान देणार आहे. दिब्रूगडहून अरुणाचलला गुवाहाटी मार्गावरून जायचे असल्यास  तब्बल 500 किलोमीटरचे अंतर लागत होते. या पुलामुळे आता 100 किलोमीटरचे अंतर कमी झाले आहे.