Breaking News

करंट्या सत्ताधार्‍यांना मनपातून दूर सारानगर । प्रतिनिधी -
एवढ्या मोठ्या ऐतिहासिक नगर शहरात महानगरपालिकेकडून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. माळीवाडा परिसरातील प्रभागाचे नेतृत्व स्वत: महापौर करत आहेत तरीही या भागाचा विकास झाला नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. वर्षानुवर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता भोगली. नागरिकांना सर्व सुविधा देणे हे महापालिका सत्ताधार्‍यांचे कर्तव्य असते. मात्र नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवून निर्लज्जपणे मते मागितली आहेत. त्यांच्या या कारभाराबद्दल नागरिकांना चीड येत असून करंट्या सत्ताधार्‍यांना व दृष्टीहीन नेतृत्वाला दूर सारुन महापालिका भाजपच्या ताब्यात द्या. विकास काय असतो, हे आम्ही काही महिन्यांत दाखवू, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
भाजपच्या प्रभाग 12मधील उमेदवार दीप्ती सुवेंद्र गांधी, निर्मला गिरवले, शैलेश मुनोत व हरिभाऊ डोळसे यांंच्या प्रचारार्थ माळीवाडा वेशीजवळ झालेल्या जाहीर सभेत मंत्री कांबळे बोलत होते. यावेळी आ.भीमराव धोंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार दिलीप गांधी, अ‍ॅड.अभय आगरकर, संगमनेरचे माजी नगरध्यक्ष राधावल्लभ कासट, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, गटनेते सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, किशोर बोरा, जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे सलीम बागवान आदिंसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर राजकारण न करता गरीब, मागासवर्गीय, कष्टकरी जनतेसाठी भरपूर योजना आणून प्रत्यक्षात राबविल्या आहेत. देशाचे भवितव्य हे दोघेजण घडवत आहेत. नगर शहराच्या भवितव्यासाठी भाजपलाच साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ.भीमराव धोंडे, अ‍ॅड.अभय आगरकर, सुनील रामदासी, सलीम बागवान आदींनी मनोगत व्यक्त केले. सुरेश खरपुडे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत साठे यांनी आभार मानले.