Breaking News

पाण्याविना माणदेशी लोकांसह जनावरांनी जगायचे कसे?


बिदाल, (प्रतिनिधी) : माण तालुक्यातील 70 गावात वाडया वस्त्यांवरील नागरिक व जनावरांना भीषण पाणी व चारा टंचाईस गेल्या एक महीन्यापासून तोंड द्यावे लागत आहे. पावसाळा अद्याप 8 ते 9 महिने दूर असल्याने नोव्हेंबर महिन्यातच या भागातील तीव्र पाणी टंचाईची दाहकता समोर येत आहे. त्यामुळे कोणी पाणी देता का पाणी ? म्हणण्याची उत्तर माण तालुक्यातील परिसरातील 32 गावांवर आली आहे. तर या गावांचा शासनाने अती तीव्र दुष्काळी गावात समावेश करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

टँकरद्वारे येणारे पाणी भरण्यासाठी घरांपुढे बॅलर मांडण्यात आले आहेत. स्वातंत्रोत्तर काळानंतर अनेक निवडणुका झाल्या. या भागातील मह्त्वाचा असणारा पाणी प्रश्‍न निवडणुकी वेळी फक्त सोडविण्याचे आश्‍वासन देऊन या भागातील नागरिकांना पाण्यावाचून केवळ झुलवत ठेवण्याचा प्रकार लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप आता पाण्यासाठी आर्त टाहो फोडणार्‍या या परिसरातील नागरिकांमधून होताना दिसत आहे. वेळोवेळी पाणी प्रश्‍न सोडविण्याचे गाजर नागरिकांना दाखवत केवळ मतांसाठी सातत्याने दुष्काळाचा सामना करत असलेल्या उत्तर परिसरातील 6 गावांचा पाणी प्रश्‍न आत्तापर्यंत भिजवत ठेवणार्‍या लोकप्रतिनिधींनी या भागातील नागरिकांसाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडविण्याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आता निर्माण झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.माण तालुक्याच्या पश्‍चिम भागातील,पठारी भागात असलेल्या व सातत्याने पाणी टंचाईचा सामना वळई,बिजवडी, जाभुळणी, येळेवाडी, पांगरी, बिदाल, तोंडले, रांजणी, जाशी, वडगाव, देवापूर, पालवन, गंगोती या परिसरात पाणी टंचाईचे भीषण संकट येथील नागरिकांसमोर उभे राहिले आहे. विहिरी, तलाव, नाले, बोअरवेल पावसाअभावी अनेक ठिकाणी कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील पाण्याचे संकट आता अधिकच भीषण झाले आहे. पाळीव प्राण्यांचा,जनावरांचा चार्‍याचा प्रश्‍न देखील गंभीर झाला आहे. रब्बी हंगाम सोडाच पण खरिपात ही येथील अनेक गावातील शेतकर्‍यांना नापिकीला सामोरे जावे लागले आहे. पाण्यावाचून माणसांनी व जनावरांनी जगायचे कसे व करायचे काय? असा यक्ष प्रश्‍न या भागातील भीषण दुष्काळाची दाहकता सोसणार्‍या नागरिकां समोर भेडसावत आहे. तर या दुष्काळी गावांतील नागरिकांची पाणी प्रश्‍ना बाबत भूमिका आता अधिकच तीव्र व परखड झालेली असल्याचे पाहावयास मिळत असून निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केवळ टँकरद्वारे पाणी देऊन तात्पुरती मलमपट्टी न करता सरकारने कायमस्वरूपी व ठोस निर्णय तातडीने घेऊन प्रत्यक्ष कृतीत या भागातील नागरिकांना बारा ही महिने पाणी मिळण्याकामी जलद उपाय योजना करण्याची गरज या भागातील टंचाईग्रस्त नागरिकांतून होत आहे. यंदा माण तालुक्यात काही भागात वरुणराजाने चांगलीच पाठ फिरविल्याने अनेक गावात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. परिसरातील कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उत्तर माण तालुक्यात तर पाण्याचे टँकर पाणी विकण्याचे राजरोसपणे सुरु आहे. घाटमाथ्यावर ते दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका बॅरेलला 100 रुपये, तर टँकरला हजार रुपये मोजावे लागत आहेत. अगोदरच चालूवर्षी पावसाविना खरीप व रब्बी पेरा वाया गेला असल्याने शेतातील उत्पन्न थांबल्याने संपूर्ण अर्थकारण बिघडले आहे. त्यातच पाणी विकत घ्यावयाचे संकट ओढवले आहे.