Breaking News

मराठा आरक्षणासाठी राजकीय किंमत चुकवलेल्या शालिनीताईंना न्याय द्यावा : रवी साळुंखे


सातारा, (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणासाठी खरी लढाई लढल्या त्या शालिनीताई पाटीलच. मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर  संपूर्ण कोरेगाव मतदार संघाला आपली चूक कळून आली आहे. त्यामुळे कोरेगाव मतदार संघातील जनतेची शालिनीताईंनी पुन्हा कोरेगावात यावे अशी जनतेने इच्छा व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल त्यांना राजकीय विजनवासात जावे लागले. आता सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाचा सन्मान म्हणून शालिनीताई यांना कोरेगाव मतदार संघातून बिनविरोध निवडून द्यावे. त्यांना न्याय द्यावा, अशी पहिली जाहीर मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक रवी साळुंखे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, शालिनीताई पाटील यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त प्रभाव राहिला आहे. कोरेगाव मतदार संघाच्या त्या भाग्यविधात्या ठरल्या. आमचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व शालिनीताई पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. कोरेगावची जनता जेवढी शालिनीताईंवर प्रेम करते तेवढीच उदयनमहाराजांवर. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शालिनीताईंनी महाराष्ट्रभर रान पेटवले तेव्हाही अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला. त्या काळातही फक्त उदयनमहाराज त्यांच्या सोबत राहिले. शालिनीताईंना  मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून राजकीय पक्षाने काढून टाकले. पैसा व सत्तेच्या जोरावर मनगटशाही करुन त्यांचा कोरेगाव मतदार संघात पराभव करण्यात आला.

आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा शालिनीताईंचेच म्हणणे खरे ठरले. मात्र, शालिनीताईंना राजकीय किंमत चुकवावी लागली. या चुकीची दुरुस्ती करायची असेल तर त्यांना सन्मानाने कोरेगाव मतदार संघात बोलवावे लागेल. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग आरक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या असलेल्या शालिनीताई पाटील यांनाही अखेरची संधी म्हणून बिनविरोध निवडून द्यावे आणि त्यांचा राजकीय सन्मान करावा, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे.

कोरेगावची जनता शालिनी-ताईंच्या आगमनाची वाट पहात आहे. कोरेगावच्या जनतेनेही आरक्षणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून त्यांचा सन्मान केला पाहिजे. या मतदार संघातला घटक म्हणून आम्हीही या प्रक्रियेत सामील होवू, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे.