Breaking News

कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधीकडे कानाडोळा करणार्‍या कंपन्यांना नोटिसा


नगर । प्रतिनिधी -
कंपन्यांतून काम करणार्‍या कामगार-कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने जिल्ह्यातील 50 च्या वर कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नगर कार्यालयाने ही कारवाई केली आहे. येत्या 21 डिसेंबरपर्यंत संबंधित कंपन्यांनी आवश्यक पूर्तता केली नाही, तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 
कर्मचारी भविष्य निधीचे सदस्य असलेल्या प्रत्येक कामगार-कर्मचार्‍यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आधार कार्ड, बँक खाते व पॅनकार्ड नंबरशी संलग्न करण्याचे काम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी विभागाने सुरू केले आहे.

यामुळे संबंधित कर्मचार्‍यांच्या निधीची सुरक्षितता निश्चित होण्यासह त्यांचे भविष्यातील वा गरजेच्या वेळी भविष्य निर्वाह निधीचा क्लेमही निकाली काढणे सोपे जाणार आहे. त्यामुळे या विभागाद्वारे प्रत्येक कामगार व कर्मचार्‍यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरला त्याचा आधार कार्ड नंबर, त्याच्या बँक खात्याचा क्रमांक, तसेच पॅन कार्ड क्रमांक संलग्न करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

या कामासाठी संबंधित कामगार-कर्मचार्‍याच्या कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला गेला आहे. त्यांच्याकडून त्यांच्या कामगार-कर्मचार्‍यांची अशी आवश्यक कागदपत्रे संकलित केली जात आहेत. 
मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत नसलेल्या कंपन्यांना आता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 21 डिसेंबरची मुदत यासाठी देण्यात आली असून, तोपर्यंत ही माहिती जमा झाली नाही, तर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.