Breaking News

औंध यात्रेसाठी होमगार्डसह 100 पोलीस तैनात; बैठकीत चोख बंदोबस्ताची अनिल वडनेरेंची माहिती : हुल्लडबाजी करणार्‍यांचा बंदोबस्त


औंध (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव 22 जानेवारी रोजी संपन्न होणार असून त्याअनुषंगाने औंध पोलीस ठाण्यात प्रशासनाची बैठक झाली. यात्रा कालावधीत औंधमध्ये बंदोबस्त वाढविण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी सांगितले.

बैठकीला नायब तहसीलदार बी. एम. भादुले, सपोनि सुनील जाधव, मंडलाधिकारी प्रताप राऊत, तलाठी किशोर घनवट, सरपंच नंदिनी इंगळे, उपसरपंच सचिन शिंदे, ग्रामविकास अधिकारी चांदशा काझी तसेच विद्युत, आरोग्य, बांधकाम, देवस्थान व अन्य विभागांतील प्रतिनिधी ग्रामस्थ हजर होते. वडनेरे म्हणाले, यात्रा संपन्न होईपर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी होमगार्डसह 100 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत, तसेच गर्दी, रथमार्ग व पार्किंगची व्यवस्था योग्य प्रकारे केली जाणार आहे, सर्व विभागांनी सतर्क राहून यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. सपोनि सुनील जाधव म्हणाले की, ग्रामस्थ व यात्रेकरुनी बेवारस व संशयास्पद वस्तूला हात लावू नये, तसे कोठे आढळून आल्यास लगेच आमच्याशी संपर्क साधावा, तसेच भाविकांना, दुकानदारांना त्रास देणार्‍या व हुल्लडबाजी करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल.