Breaking News

पुण्यात 16 वर्षीय मुलाची अपहरणानंतर हत्या


पुणे : खंडणीसाठी अपहरण केलेल्या 16 वर्षीय मुलाचा खून करुन मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या वारजे परिसरात उघडकीस आली आहे. अपहरण केल्यानंतर घाबरुन जाऊन आरोपीने हा खून केला. निखिल अनंत अंग्रोळकर (16) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूत (22) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील घरी न परतल्याने अनंत अंग्रोळकर यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. निखिल हा बिनयसिंग राजपूत यांच्या घराजवळच राहण्यास असून तो जीममध्ये कामाला आहे. खंडणीसाठी आरोपीने निखिलला पळवून नेले होते. परंतु, घाबरुन जाऊन त्याने हा खून केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बिनयसिंग विरेंद्रसिंग राजपूतला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले आहे. आरोपीने चांदणी चौक ते डुक्कर खिंड दरम्यान रस्त्याच्या बाजूला खड्डा खोदून मृतदेह पुरल्याचे चौकशीत समोर आले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे. सांस्कृतिक व शांततप्रिय शहर म्हणून ओळख असलेले पुणे सध्या खूनाच्या घटनांनी हादरुन गेले आहे. सलग चौथ्या दिवशी खुनाचा प्रकार समोर आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.