Breaking News

प्रेसक्लबच्यावतीने स्व.वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पुरस्कार


श्रीरामपूर/प्रतिनिधी
पालिका व प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणार्‍या ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्काराचे वितरण लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांच्या हस्ते उद्या रविवार दि.6 रोजी सायंकाळी 5.00 वाजता आझाद मैदान येथे होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दिली.

आ.भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असून यावेळी उद्योगपती विक्रम सारडा, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, राष्ट्रवादी काग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ संपादक स्वर्गीय वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कारासाठी नगर येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाडेकर यांची तर शोध पत्रकारिता पुरस्कारासाठी राहुरी येथील दैनिक सकाळचे वार्ताहर विलास कुलकर्णी यांची, कृषी पत्रकारिता पुरस्कारासाठी सार्वमतचे भेंडा येथील वार्ताहर सुखदेव फुलारी, सामाजिक पत्रकारिता पुरस्कारासाठी नगर सह्याद्रीचे निघोज येथील वार्ताहर दत्ता उणवणे यांना, इलेक्ट्रानिक मिडिया पत्रकारिता पुरस्कारासाठी नगरच्या रेडीओ सिटीचे प्रसन्न पाठक, महिला पत्रकारिता पुरस्कारासाठी नगर आकाशवाणीच्या दिपाली जोशी यांची निवड करण्यात आली. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार गोविंद वैजापूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार देवून यावेळी गौरविण्यात येणार आहे.