Breaking News

सबरीमाला मंदिरात पुन्हा महिलांना रोखले

Image result for सबरीमाला

नवी दिल्ली : सबरीमाला मंदिरात महिला प्रवेशांचा प्रश्‍न अजुनही सुटण्याची चिन्हे नाहीत. दोन महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर, आता तरी महिलांना प्रवेश करणे सुसह्य होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र बुधवारी पुन्हा मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या 2 महिलांना आज पुन्हा अडवण्यात आले. 

रेश्मा निशांत आणि शनिला सतिश, असे त्या 2 महिलांची नावे आहेत. या दोघींना काही लोकांनी मंदिराच्या पायथ्याशीच असलेल्या नीलिमाला येथे रोखून धरले होते. यापूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच 2 महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश केला होता.

या महिलांनी नोव्हेंबर 2018 मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन मंदिरामध्ये जाण्याची इच्छा वर्तवली होती. त्यानंतर त्यांनी आज मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सनातनी लोकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून थांबवले. दरम्यान भाविकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेच त्या महिलांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे त्या महिलांना शेवटी माघार घ्यावी लागली. शबरीमला मंदिरामध्ये 50 वर्षे वयाखालील महिलांना जाण्यास अनेक वर्षापासून बंदी आहे. मात्र, या बंदीने समानतेच्या हक्काची पायमल्ली होते, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली होती. त्यानंतर अनेक महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही सनातनी लोकांचा न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध आहे.