Breaking News

कोरठण खंडोबा मंदिर येथे वार्षिक यात्रा


नगर/प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबा मंदिराच्या वार्षिक यात्रा उत्सव दि 21 ते 23 जानेवारीला होत असून या लग्न सभारंभासाठी तयारी पूर्ण होत आली आहे. सध्या देवाला मोन्डोळ्या बांधण्यात आल्या आहेत. तर विविध नियोजनाचे काम चालू आहे. देवाचे नवरात्र सुरु झाले असून हळद पण लावण्यात आली आहे. लग्नानिमित्त  हळद लावून झाल्यावर गावातील लग्न परंपरेने मांडव डहाळे वाजत गाजत आणण्यात आले.

व महिलांनी देवाच्या मूर्तीला मांडुल्या बांधल्या, महाप्रसादाचा कार्यक्रम झाला व  यात्रेच्या तयारीला वेग आला. पिंपळगाव रोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर 3 दिवस भाविकांची देवदर्शनाला गर्दी होते. दिवसभर तळी भांडार, देवदर्शन सुरू असताना सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी कोरठण खंडोबाच्या ‘नावानं चांगभलं’ या जय घोषाने खंडोबानगरी दुमदुमून जाते. दुसर्‍या दिवशी पालखी सोहळा, छबिना मिरवणूक आदी कार्यक्रम तर तिसर्‍या दिवशी खंडोबा चांदीची पालखी मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मिरवणुकीमध्ये पालखीचे मानकरी सहभागी होते. त्यानंतर आलेल्या पालख्यांमुळे सर्व रस्ते भाविकांनी गजबजतात नंतर काठ्यांची मिरवणूक नांदूर पठार रस्ता, कोरठण गाव रस्ता, बेल्हे मार्गावरील रस्त्यांपासून सुरुवात होते मानाच्या काठ्यां देवाच्या व कळसाला टेकवल्यावर सांगता होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, चिटणीस मनिषा जगदाळे, गुंजाळ, अन्नछत्र , अमर गुंजाळ, किसन मुंढे, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, बाळासाहेब पुंडे, राजू मटाले, रामदास मुळे, सुरेश ढोमे, शांताराम खोसे, गोपीनाथ घुले, जालिंदर खोसे,  उत्तम सुबरे, राजाराम मुढे आदींसह पंचक्रोशीतील महिला यांनी प्रयत्न केले.