Breaking News

दुष्काळ निवारण मदत केंद्राच्या माध्यमातून जनावरांना चारापाणी'; समाजिक उपक्रमांतर्गत; जनावरांना पुरवणार खाद्य


शिरूर/प्रतिनिधी
राज्यात सर्वत्र दुष्काळाचे भीषण सावट पसरले असताना शिरूर तालुक्यात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमालाला बाजारभाव हवा होता तसा मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या शेतकर्‍यांपुढे उदरनिर्वाह करणार्‍या बरोबर जनावरांच्या चार्‍यासह पाण्याचा बिकट प्रश्‍न भेडसावत आहे. शेतकर्‍यांने कुटुंब व जनावरांचे संगोपन कसे करावे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्व.कमलबाई रसिकलालजी धारिवाल यांच्या 7 व्या पुण्यस्मरण निमित्त प्रसिध्द उद्योगपती प्रकाश धारिवाल, आदित्यकुमार प्रकाशलाल धारिवाल परिवाराच्यावतीने दुष्काळाच्या पार्श्‍वभुमिवर शिरूर, श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यातील शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे करून शिरूर येथील श्री गोरक्षण पांजरापोळ संस्था येथे दुष्काळ निवारण मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी आपली जनावरे शिरूर येथील पांजरापोळमध्ये सोडवावी त्यांना चारा व पाणी पुरविण्याचे काम करणार आहे. पावसाळ्यानंतर चार्‍याचा प्रश्‍न मिटल्यानंतर आपली जनवारे घेऊन जाण्याचे आवाहन प्रसिध्द उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी नागरीकांना केले आहे.

याप्रसंगी पहाणी करताना धारिवाल यांनी जनावरांना चारा देताना सांगितले की, गोमाता ही तुमची आमची सर्वांची माता आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी पांजरापोळ संस्थेचे रमणलाल बोरा, प्रकाश कोठारी, रयत शिक्षण संस्थेचे जाकिरखान पठाण, नगरपरिदेचे बांधकाम समिती सभापती अभिजीत पाचर्णे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक दादा वाखारे, संतोष भंडारी, सुरेश बोरा, संतोष शितोळे, उद्योजक सुभाष गांधी, प्रशांत शिंदे, तुकाराम खोले, रुपेश संघवी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी टंचाईमुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्यास शिरूर तालुक्यासह इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न संपेपर्यंत आपली जनावरे पांजरापोळ संस्थेत आणून सोडावी. त्यांना चारा पाणी पुरविण्याचे काम करणार असून पावसाळ्यानंतर चार्‍याचा प्रश्‍न संपल्यानंतर आपापली जानावरे पुन्हा घेऊन जाण्याचे आवाहन प्रसिध्द उद्योगपती व सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी शेतकर्‍यांना केले आहे. शिरूर शहर श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील शंभर जनावरे येथील पांजरापोळ संस्थेत दाखल झाली आहेत. मे महिन्यापर्यंत जेवढी जनावरे दाखल होतील त्या जनावरांच्या चारा-पाण्याचा खर्च माणिकचंद उद्योग समुहाचे अध्यक्ष उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल करणार आहेत. धारीवाल परिवाराने स्व.मातोश्री कमलाबाई धारीवाल यांच्या स्मरणार्थ शिरूर येथे सुरू केलेल्या पांजरापोळ संस्थेतील जनावरांसाठी स्वतंत्र छावणीत आगामी चार महिन्यात दाखल होणार्‍या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार महिन्यात जेवढी जनावरे दाखल होतील तेवढ्या जनावरांचा खर्च ते करणार आहेत. धरिवाल यांनी उभारलेल्या छावणीवर पत्र्याची शेड पांजरपोळ संस्था सुरू करणार असल्याचे अध्यक्ष रमणलाल बोरा यांनी सांगितले.