Breaking News

कोडोलीत सपासप वार करून युवकाचा खून; कोडोलीसह जिल्हा रुग्णालय परिसरात तणाव


सातारा (प्रतिनिधी): किरकोळ कारणांसह पूर्ववैमनस्यातून येथील दत्तनगर, कोडोली परिसरात सम्राट विजय निकम (वय 27, रा. कोडोली) या युवकाचा मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार करून खून झाला आहे. या प्रक़ाराने सातारा शहर परिसर हादरला असून या खूनाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादाच्या कारणातून हा खून झाला असल्याचे उघडकीस येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर कोडोलीसह सिव्हिल हॉस्पिल येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी हॉस्पीलसह कोडोलीतही बंदोबस्त वाढवला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सम्राट निकम हा युवक मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कोडोलीतील पेट्रोल पंपावरून निघाला होता. त्यावेळी एका टोळक्याने कोयत्यासह हॉकी स्टिक व इतर शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. सम्राटने हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर एकामागोमाग सपासप वार करत असल्याने त्याचा प्रतिकार कमी पडत होता. या हल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळीच हत्यारे टाकून हल्लेखोर पळून गेले. भर रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सम्राट याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. निकम कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व सिव्हिलमध्ये धाव घेतली. रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन संशयितांचा शोध सुरू केला आहे.