Breaking News

श्रीगोंद्यात भाजप उमेंदवारांच्या प्रचारास प्रारंभ


श्रीगोंदे/प्रतिनिधी
श्रीगोंदा येथील नगरपालिकेचा निवडणूक रणसंग्राम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दि. 17 रोजी श्रीगोंदा येथील ग्रामदैवत संत शेख महंमद महाराजांच्या प्रांगणात भाजप उमेदवारांचा प्रचारास प्रारंभ झाला. यावेळी भानुदास बेरड, बाळासाहेब महाडिक, गुलाबराव खेडकें, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीता शिंदे यांसह नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते, तर पोपट खेतमाळीस, सतिष पोखरणा, संतोष इथापे, संदीप नागवडे, अल्लाउद्दीन काझी यांची भाषणे झाली.

याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी असे प्रतिपादन केले की, शहराच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करून मोठा निधी उपलब्ध करून दिला असताना अनेक विकास कामात खोडा घातला, अनेक कामे अर्धवट अवस्थेत राहिली लेंडी नाला सुशोभीकरणच्या कामाला कोर्टात जाऊन स्थगिती घेतली. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवून शहराचा विकास करण्याची संधी दिली त्या नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला. यावेळी जि.प. सदस्य सदाशिव जगताप यांनी असे प्रतिपादन केले की, आम्ही ठरवलं असतं तर तुम्हाला जेलच्या बाहेर पडता सुद्धा आलं नसतं तुम्हाला जमीन सुद्धा अपुरी पडली असती, याचे भान ठेवावे अनेक छोटे कार्यकर्ते यांना मोठे केले असून मोठे केले की ते विरोधात जातात आम्ही किरकोळ व्यापारी आणि ते ठोक व्यापारी असल्याची टीका नाव न घेता पाचपुतेंनी केली. श्रीगोंदा शहराचा विकास फक्त आणि फक्त बबन पाचपुतेंनी केला असून राहिलेला विकास सुद्धा बबन पाचपुतेच करणार आम्ही वारीला जाणारे वारकरी , आम्ही्ही देवाच्या आळंदीला जातो. विरोधक मात्र चोराच्या आळंदीला जातात. श्रीगोंद्याचे नाव दादांनी जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नेले असून श्रीगोंदा नावलौकिक प्राप्त करून दिला व दादांनी अथक प्रयत्न करून 140 कोटी रुपयांचा निधी श्रीगोंदा नगरपालिका ‘क’ वर्ग दर्जा असताना सुद्धा मिळवून दिला आहे. त्यामुळे शहरातील जनतेने सद्सदविवेक बुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तुकाराम दरेकर म्हणाले की, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून 140 कोटी रुपये निधी आणला, परंतु मनोहर पोटे अध्यक्ष झाल्यानंतर या कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली, असल्यामुळे पोटे यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे होताना दिसत असले, तरी त्याचे सगळे श्रेय पाचपुते यांचे असून उलट पोटे यांनी पाचपुतेंनी आणलेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मैला काढण्यासाठी लागणारे मशीन मुळात चार लाख रुपयाचे असून कागदोपत्री साडेसात लाख रुपयाचे दाखवून चार लाख रुपये खाल्ले असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच जिओ कंपनीची केबल टाकण्यासाठीही मोठी तडजोड केली. रस्त्याच्या कामात रस्ता न खोदता खोदकामाचे बिले काढून 15 कोटी रुपये खाल्ले असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. सभेपूर्वी शहरातून पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी सभेस नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.