Breaking News

राम मंदिरासाठी अध्यादेश नाही; मोदी यांचे स्पष्टीकरण; कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार


नवीदिल्लीःराम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी जोर धरत असतानाच राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. 

अयोध्यत राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहू नका, अध्यादेश काढा, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. विश्‍व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही असाच आग्रह धरला होता. मित्रपक्ष आणि संघ परिवारातील संघटनाच भाजप सरकारवर दबाव वाढवीत आहेत. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्यात अर्थ नाही. न्यायालयाला धार्मिक भावनेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. बहुसंख्याकांचे हित न्यायालय पाहत नाही, असा टीकेचा सूर या संघटनांनी लावला होता. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. सर्वोच्च न्यायालय नियमित सुनावणीचा निर्णय लवकरच घेईल. असे असले, तरी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संघ परिवारासह शिवसेनेने भाजपवर दबाव वाढवून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करत राम मंदिरासाठी आग्रही भूमिका घेतली. राम मंदिराच्या प्रश्‍नावर किंवा अध्यादेश काढण्याच्या मागणीवर मोदी यांनी अद्याप काहीही भूमिका मांडलेली नव्हती. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबणार असल्याचे नमूद केले होते. आता त्याचीच री ओढत मोदी यांनीही राम मंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल, असे म्हटले आहे. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश काढला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधून बोध घेत आता भाजपने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच सभा घेणे निश्‍चित केले आहे. या सगळ्या सभांमध्ये मोदी गेल्या साडेचार वर्षात त्यांच्या सरकारने केलेली कामे जनतेपुढे ठेवतील. तीन जानेवारीला पंजाबच्या जालंधर आणि गुरूदासपूरमध्ये पंतप्रधानांची रॅली आहेत. त्यानंतर सभा होणार आहे. ही मोदी यांची नव्या वर्षातली पहिलीच सभा आहे; मात्र याकडे लोकसभेची तयारी म्हणूनच पाहिले जात आहे. मोदी यांच्या इतर रॅली आणि सभांच्या तारखा नंतर जाहीर होणार आहेत. 2014 मध्ये ज्या जागांवर चांगले यश मिळाले नाही, त्या जागा काबीज करण्याचा भाजपचा विचार आहे. त्याच अनुषंगाने मोदींच्या शंभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आता याचा परिणाम कसा होतो? विरोधक या रणनीतीविरोधात त्यांची काय रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


वीस राज्यांत शंभर सभा


लोकसभा निवडणुकालवकरच जाहीर होणार आहेत. त्यांची तारीख अजून जाहीर झालेली नाही; मात्र मोदी यांनी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. देशातील 20 राज्यांमध्ये मोदी शंभर सभा घेणार आहेत.