Breaking News

तडवळे - आसनगाव रस्त्यावर चक्क मंगळ प्रवासाचा अनुभव
वाघोली,  (प्रतिनिधी) : कोरेगाव भागातील तडवळे- आसनगाव रस्ता हा वाहतुकीकरीता पूर्णतः निकामी झाला आहे. हा डांबरी रस्ता उखडून दोन्ही बाजूने खचल्याने आपला जीव मुठीत घेवून वाहनधारकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत आहे. तातडीने या रस्त्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी परिसरातील वाहनचालकांतून होत आहे.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती शेती असल्याने येथील शेतकरी ऊस, हळद, मिरची, फ्लॉवर यांसारखी पिके घेत असल्याने या रस्त्याचा वापर शेतकरी, मजूर, मालवाहतूक गाड्या तसेच शाळेत जाणारे विद्यार्थी करीत असतात. संबंधित रस्ता हा 3.26 किमीपेक्षा जास्त लांबीचा असून रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की, खड्ड्यांमुळे नागरिकांना मंगळ ग्रहाचा अनुभव थेट या तडवळे-आसनगाव रस्त्यावर अनुभवता येत आहे. दगडी खडी विसकटल्याने रस्त्यावरून जाणार्‍यादुचाकी गाड्या घसरून गाडीचा खुळखुळा होवून काही दुचाकीस्वारांनी आपले हात-पाय गामावले असून अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. या रस्त्यावरून जाणारी गाडी हमखास गरेजची वारी करीत असते. या रस्त्याची ओळखही अशी झाली आहे कि, अनोळखी पाहुणा आसनगाव, तडवळे गावाकडे निघाला तर खड्डे असलेल्या रस्त्यावरूनच आपल्याकडे येवू ना..? असे विचारून थेट आसनगाव-तडवळेत पोहचतात.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच त्याचबरोबर पाईपलाईनसाठी खोदलेले चरीही आहेत त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसह सायकल वरून शाळेला जाणार्‍या मुला मुलींसाठी धोकादायक बनला आहे. रस्ता एकार असल्याने दोन मोठी वाहने सामोरासमोर आल्यानंतर वाहनाची एक बाजू रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या काटेरी झुडपांमध्ये झुकवावी लागते. वाहनामध्ये जास्त बोजा असेल तर एकार आणि उताळ रस्त्यामुळे वाहन पलटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या रस्त्यावर एवढे मोठमोठे खड्डे पडल्याने पुढच्या गाडीला हॉर्न वाजवायची गरज नसते कारण गाडी एवढ्या मोठ्याने आदळते कि समोरचा वाहन चालकआपोआप समजून जातो की पाठीमागून वाहन येत आहे.
अशीच दयनीय परिस्थिती या संपूर्ण रस्त्याची आहे. हा रस्ता डांबरी आहे असे शपथ घेवून जरी एखाद्यास सांगितले तरी ते खरे वाटणार नाही. खड्डे चुकवा आणि बक्षीस मिळावा, अशी पैज लावली तरी कोणीही पैज जिंकू शकणार नाही.