Breaking News

डेअरीतील कामगाराच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गु्न्हा


कराड (प्रतिनिधी) : पाचवड फाटा येथील मुधाई डेअरीमध्ये मशिनचे झाकण लागून 22 ऑक्टोबर रोजी उमेशकुमार यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून डेअरीचे मालक हणमंत महादेव चव्हाण आणि दत्तात्रय महादेव चव्हाण (रा. दहिगाव, ता.कोरेगांव) यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रितादेवी उमेशकुमार यादव रा. कालेटेक (मूळ रा. उत्तरप्रदेश) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यामध्ये 22 ऑक्टोबर 2018 रोजी मुधाई डेअरीतील फोनवरून माझे पती उमेशकुमार यांचा अपघात झाल्याचे मला कळविण्यात आले. मी डेअरीमध्ये पोहचले असता, माझ्या पतीला चादरीमध्ये गुंडाळलेले होते. त्यावेळी त्यांच्या अंगातून व चादरीतून रक्त येत होते. तेव्हा त्यांना डेअरी प्रशासनाने कोणतेही सुरक्षात्मक उपाययोजना किंवा हेल्मेट दिलेले नसल्याचे दिसून आले. तेथे गेल्यानंतर मला समजले की, डेअरीमध्ये काम करीत असताना स्टर्लायझर मशीनचे झाकण त्यांच्या डोक्याला लागले होते. त्यावेळी त्यांना कोणतेही सुरक्षात्मक साधने पुरविलेली नव्हते, त्यामुळे मशीनचे झाकण लागून ते गंभीर जखमी झाले होते. तेथून त्यांना उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी ते मृत झाल्याचे सांगितले. त्यामुळे कराड तालुका पोलिस ठाण्यात डेअरीमालक दोघांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.