Breaking News

भाजपच्या रथयात्रेचे चाक निखळले! उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेपास ‘सर्वोच्च’नकार!नवीदिल्लीः रथयात्रेसंदर्भात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली निघणार्‍या ‘गणतंत्र बचाओ’ रथयात्रेचे भवितव्य अंधारले आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला ‘गणतंत्र बचाओ’यात्रा काढण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला आहे. यात्रेला परवानगी न देण्याच्या पश्‍चिम बंगाल सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. शाह यांच्या नेतृत्वाखाली निघणार्‍या ‘गणतंत्र बचाओ’रथयात्रेला पश्‍चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली होती. भाजपने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोलकाता उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय पीठाने या याचिकेवर निर्णय देताना भाजपला रथयात्रेची परवानगी दिली होती. एक सदस्यीय पीठाच्या निर्णयाला पश्‍चिम बंगाल सरकारने द्विसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान दिले. द्विसदस्यीय खंडपीठाने परवानगी देण्याचा निर्णय रद्द केला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच भाजपकडून यासंदर्भात नव्याने प्रस्ताव दिल्यास विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.