Breaking News

...अखेर वाई ग्रामीण रूग्णालयाला मिळाले डॉक्टर; तात्पुरती मलमपट्टी किती दिवस टिकणार; आंदोलन तूर्त स्थगित


वाई (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागरीकांसह रूग्णांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयातील प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे वारंवार रिक्त होवून कित्येक महिने कायम गॅसवर असणार्‍या वाईच्या ग्रामीण रूग्णालयासह सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षकांकडून अखेर वाईकरांच्या सेवेसाठी दोन महिला डॉक्टरची पाठवणी केल्याने वाईतील तालुक्यातील गोरगरीब ग्रामीण जनतेला औषधोपचाराची सोय झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कायमच सलाईनवर असणार्‍या वाई ग्रामीण रुग्णालयात सातारा जिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षकांकडून तमाम वाईकरांची तात्पुरती का होईना डॉक्टर देवून केलेली मलमपट्टी किती दिवस टिकणार? का परिस्थीती पुन्हा जैसे थे रहाणार हे येणारा काळच ठरवणार असला तरी रुग्णांचे हाल होवून जिल्हा प्रशासनाला जाग येत नसल्याने वाई ग्रामीण रूग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर नेमणुकीसाठी सरकारी दवाखान्याला टाळे ठोकण्याचा निर्णय येथील जनतेने माघारी घेतला आहे.

वाई ग्रामीण रुग्णालयात नेमणूक केलेल्या डॉक्टरांना काही दिवसातच पुनःश्‍च सातारला अधिग्रहन केले जात होते त्यामुळे वाई ग्रामीण रूग्णालयाचा गुंता सुटण्याऐवजी वाढत जावून सर्व सामान्य जनता वैतागुन गेली होती वाईला कायमचा डॉक्टर मिळत नसल्यामुळे दवाखाना असूनही नसल्यात जमा असलेने लोकाऩा खाजगी दवाखान्याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत होता मुख्य अधिक्षक डॉक्टरांसह तीन प्रमुख डॉक्टर मिळून एकूण 26 कर्मचारी असलेल्या वाई तालुक्यातील गोरगरीब जनतेचा आधार असलेल्या वाई ग्रामीण रूग्णालयात रूग्णांसाठी तीस बेडची व्यवस्था असून या ठिकाणी किरकोळ उपचारासाठी 400 ते 450 रुग्ण दररोज हजेरी लावतात त्याच बरोबर एमएलसी केसेस, डिलिव्हरी व अँक्सीडेंट पेशंटसह जनरल पेशंटची या रूग्णालयात सतत ये जा चालू असते गेली दोन वर्षापासून एकही स्थायी वैद्यकीय अधिकारी व इतर सहकारी डॉक्टर कायमस्वरूपी वाईला मिळत नसलेने रूग्ण सेवेवर विपरीत परिणाम होवून सर्व सामान्य जनतेला त्याचा झटका सहन करावा लागत होता याचे कसलेही सोयरसुतक वाई तालुक्यातील विविध राजकीय पुढारी व नेत्यांना नसल्याने जनतेतुन आश्‍चर्य व्यक्त केले जात होते येथील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची थट्टा केली जात होती याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थीत केला जात होता. जिल्हा अधिक्षकांनी याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टरची नेमणूक केलीतरी मदतीला अन्य डाँक्टर नसल्याने संबंधीत डॉक्टर काहीतरी कारण काढून वाईमधून काढता पाय घेत असल्याने पुन्हा जैसे थे परिस्थीती निर्माण होवून रूग्णांची हेळसांड झाली तरी याची जबाबदारी कोणच घेत नव्हते याबाबत वाई रूग्णालय प्रशासाने शासन व जिल्हा अधिकार्‍यांशी अनेकवेळा पत्रव्यवहार केले परंतू आजपर्यंत कुठल्याही राजकीय पुढार्‍यांना जनतेचाकळवळा आला नाही डॉक्टर नसतानाही येथील कर्मचारी मिळेल त्या डॉक्टर सहकार्याला बरोबर घेवून दवाखान्याचा भार पेलून रुग्णांना सेवा देताना त्यांची अक्षरश: दमछाक होत असल्याचे दिसत होते मुख्य तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अनेकवेळा गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागत होता एखाद्या भयंकर दुर्घटनेप्रसंगी डॉक्टरविना काम करणार्‍या नर्स व अन्य कर्मचार्‍यांना त्याचा दगाफटका होण्याची शक्यता असतानाही संबंधीत कर्मचारी जीव मुठीत घेवून कर्तव्य बजावताना रुग्णांना सेवा देताना दिसत होते. वाई ग्रामीण रूग्णालयात तज्ञ डाँक्टर आल्याने डिलेव्हरी प्रसंगी महिलांचा संभाव्य धोका टळला असून अपघातग्रस्त रूग्ण, मृत व्यक्तींचे शवविच्छेदन व आरोपींच्या मेडिकलसाठी वाई पोलीसांना भुईंज अगर सातार्‍याला करावी लागणारी धावपळ थांबणार एवढे नक्की.