Breaking News

औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा गैरवापर; संगमनेर डॉक्टर संघटनेचा आरोप


संगमनेर/प्रतिनिधी
डॉक्टर रुग्णांना लिहून देत असलेल्या प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढण्याचे प्रकार औषध कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संगमनेर डॉक्टर संघटनेने ठराव करून यावर बंदी घातली आहे. असा प्रकार करणार्‍या संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीविरुध्द कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
इंडियन मेडीकल असोसिएशनच्या संगमनेर शाखेने हा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष डॉ. एम.डी.घुले आणि खजिनदार डॉ.डी.एल. शेळके यांच्या सहीचे हे इशारापत्र रुग्णालयात लावण्यात आले आहे. यासंबंधी देण्यात आलेल्या इशारापत्रात म्हटले आहे की, काही औषध कंपन्यांचे प्रतिनिधी (एम.आर) रुग्णालयात आल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णांना लिहून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढून घेत आहेत. त्याचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जात आहे. काही कंपन्या आपल्या औषधांची विक्री किती होते, आपले प्रतिनिधी किती काम करतात, अशी माहिती मिळविण्यासाठी प्रतिनिधींना प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढून पाठविण्यास भाग पाडत असल्याचेही लक्षात आले आहे.

मात्र, वैद्यकीय कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा ठरतो. प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांनी उपचार आणि रुग्णांची माहिती लिहिलेली असते. ही माहिती गोपनीय राहणे आवश्यक असते. फोटो काढल्यास रुग्णांची ही माहिती सोशल मीडिया आणि अन्यत्र प्रसिद्ध होण्याचा धोका असतो. याशिवाय यातून अन्यही गैरप्रकारांना वाव मिळू शकतो. संगमनेरमधील काही ठिकाणी असे प्रकार झाल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे संघटनेने नुकताच हा निर्णय घेतला आहे. तशी कडक सुचना एमआर मंडळींना देण्यात आली आहे. असा प्रकार करताना कोणी एमआर आढळून आला तर त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. मात्र, यापुढे त्या प्रतिनिधीला औषधांची माहिती देण्यासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. केवळ संगमनेरच नव्हे, तर अनेक ठिकाणी असे प्रकार घडतात. यापूर्वी चिपळूणमध्येही डॉक्टरांनी असाच निर्णय घेतल्याची माहिती मिळाली. नगर जिल्ह्यात संगमनेरमधून यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांनीही आपल्याकडील प्रिस्क्रिप्शन इतरांच्या हातात देताना यासंबंधी काळजी घेण्याची गरज आहे.

कंपन्यांचाच उद्योग 
औषध निर्मिती कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा आहे. आपली औषधे जास्तीत जास्त लिहून दिली जावीत, यासाठी त्यांचे विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असतात. प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढण्यासाठी काही कंपन्यांच आपल्या प्रतिनिधींना उद्युक्त करत असल्याची माहिती मिळाली. त्यातून त्यांना ड़ॉक्टर आणि प्रतिनिधी दोघांवरही लक्ष ठेवता यावे, असा त्यांचा उद्देश असावा. मुळात अनेक एमआर मंडळींचाही फोटो काढण्यास विरोध आहे.

प्रिस्क्रिप्शनचे फोटो काढले जात असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्या आहेत. रुग्णांवरील उपचारांची माहिती उघड करणे गुन्हा आहे. त्यामुळे संघटनेने असे फोटो काढण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यापुढे कोणी फोटो काढताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल- डॉ.एम.डी. घुले, अध्यक्ष, आयएमए संगमनेर