Breaking News

सातार्‍याच्या उद्यानांमध्येही रात्रीच खेळ चाले.... पालिकेच्या बगिचा परिसरात वाढली सर्रास अतिक्रमणे


सातारा (प्रतिनिधी) : शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी सातारा पालिकेला मिळाला असून त्याअंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र, बीओटी तत्वावर बागा ज्यांना दिल्या त्यांनी पुरती धूळधाण केली असताना उद्यान परिसरात सर्रास अतिक्रमणे वाढली आहेत. या कारभाराला पायबंद घालण्यासाठी पालिकेचा अतिक्रमण विभाग सक्रिय करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.


सातारा नगरपरिषद हद्दीत राजवाडा, सदरबझार आणि गुरुवार पेठेत उद्यान आहे. येथे अद्ययावत खेळणी, कारंजे पालिकेने बसवले. त्याकरिता वेळोवेळी मोठा निधी खर्ची टाकला. मात्र, त्याचवेळी संस्थांना उद्याने चालवण्यासाठी देण्यात आली. पुढे ‘तळे राखी तो पाणी चाखी’ या उक्तीप्रमाणे ही उद्याने तळीरामांचा अड्डा बनली, हे सर्वश्रुत आहे. आता पुन्हा नव्याने पालिका निधी खर्ची टाकून पुन्हा उद्याने धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा कुटील डाव पालिकेतून खेळला जात आहे. राजवाडा बागेतील सार्वजनिक नळाच्या पाण्यावर मलिदा लाटणारे रात्रीच्या मैफिली रंगवतात. तोच काहीसा प्रकार सदरबझार येथे पहायला मिळतो. गुरुवार बागेतील तर न बोललेले बरे, असा प्रकार आहे. कधी काळी अखंड भारताचा कारभार गुरुवार बाग अर्थात तख्ताच्या वाड्यातून चालत होता. आता त्याच जागेवर तळीरामांनी उच्छाद मांडला आहे. लगतच्या भिंतीवर कळकांचे ओझे टाकले असून त्यामुळे ही भिंत जीर्ण झाली आहेत. बागेच्या दर्शनी भागापासून मुख्य रस्ता आणि पाठीमागच्या बाजूपर्यंत पडलेला बोजा बागेची दुरावस्था सांगत असून पालिकेच्या दुर्लक्षामुळे बागांची अवस्था दयनीय झाली असल्याची टीका नागरिकांमधून केली जात आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बागेत असलेली खेळणी मुलांना वेदना देणारी असून ज्येष्ठांना हवा असलेला एकांत आणि शांतता तळीरामांनी हिरावून घेतली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली असून याबाबत ठोस कार्यवाही करून बागांचा श्‍वास मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.