Breaking News

हिसका देऊन गळ्यातील सोन्याची चेन पळविली
पाथर्डी/प्रतिनिधी
शहरातील नवीन बस स्थानकातुन गुरुवारी रात्री पावणे सात वाजण्याच्या सुमारास पाथर्डी-नगर बसमध्ये चढत असतांना भारत जरांगे रा.पुणे यांच्या गळ्यातील सुमारे दिड तोळ्याची 40 हजार रु. किंमतीची चेन गळ्यातून हिसका देऊन पळवून नेल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विशाल गायकवाड व इतर 3 अनोळखी इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अरविंद चव्हाण करत आहेत.
        याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथून भारत जरांगे हे आपल्या कुटुंबासह बुधवारी दुपारी पुण्याहून मातोरी येथे पाहुण्याच्या घरी लग्नसमारंभासाठी आले होते. गुरुवारी दुपारी मातोरी येथील लग्नसमारंभ संपन्न झाल्यानंतर सायंकाळी जरांगे हे कुटुंबासह मातोरीहुन पाथर्डी येथील नवीन बसस्थानकावर आले. यावेळी ते पावणे सातच्या सुमारास पाथर्डी-नगर बस आली होती. यावेळी बसमध्ये भारत जरांगे हे चढत असतांना दोन ते तीन तरुणांनी त्यांना धक्का देत त्यांच्या गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून पळवून नेली. यानंतर तात्काळ पोलिस हवालदार अरविंद चव्हाण यांनी नवीन बसस्थानकावर जाऊन पाहणी केली. यावेळी नवीन बसस्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन ते चार चोरटे कैद झाले असून त्यातील एकाची ओळख पटली असून त्यांच्यावर त्याच्या इतर तीन साथीदारावर पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.