Breaking News

लोकशाही पंधरवडा प्रभावीपणे राबविणार : शरद मगर


कोरेगाव (प्रतिनिधी) : प्रजासत्ताकदिनापासून दहा फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत सर्वत्र लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत उपयुक्त उपक्रम तसेच तालुका पातळीवर विशेष कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा विश्‍वास गटविकास अधिकारी शरद मगर यांनी व्यक्त केला आहे. 


कोरेगाव पंचायत समितीत ग्रामसेवकांच्या तालुकास्तरीय सभेमध्ये संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत विस्ताराधिकारी चंद्रकांत घारे, सुनील जगताप , श्री. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होेती. 


ङी. मगर म्हणाले, लोकशाही देशात अनेक उपक्रम राबवले जाणे गरजेचे असते. त्यानुसार तळागाळात लोकशाहीचे महत्त्व रुजवणे गरजेचे ठरते. या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी चर्चा प्रबोधन परिसंवाद इत्यादी उपक्रम प्रभावीपणे तालुक्यात राबवले जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व जनमानसात रुजवणे तसेच त्यांची कार्यप्रणाली जनसामान्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीचा आदर जनमानसात विद्यार्थ्यांमध्ये अशा अनेक घटकांमध्ये वाढेल, असे सांगून ते म्हणाले लोकशाही हा एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे सर्वांनी मिळून एकदिलाने साजरा करूया. चंद्रकांत घारे यांनी प्रास्ताविक, तर सुनील जगताप यांनी आभार मानले.