Breaking News

नागरी समस्या सोडवण्यास नगरसेवकांनी प्राधान्य द्यावे : आ. शिवेंद्रसिंहराजे


सातारा (प्रतिनिधी) : नगरविकास आघाडी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटीबध्द राहिली आहे आणि पुढेही राहिल. नगरसेवक रवी ढोणे, सौ. सोनाली नलवडे यांनी त्यांच्या प्रभागात चांगले काम करुन आदर्श निर्माण केला आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 


प्रभाग क्र. 19 मध्ये नगरसेविका सौ. नलवडे यांच्या संकल्पनेतून मंगळवार पेठेत दर्ग्याकडे जाण्यासाठी पायर्‍या बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. या कामाचा प्रारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालिकेतील विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम, रवी ढोणे, शेखर मोरे- पाटील, सौ. सोनाली नलवडे, सौ. दीपलक्ष्मी नाईक, सौ. मनिषा काळोखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


निधी आहे म्हणून तो कुठेही वापरुन चालत नाही तर, त्या निधीतून नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, तशी विकासकामे त्या निधीतून झाली पाहिजेत. नागरिकांना अपेक्षित विकासकामे झाली तरच प्रभागातील समस्या सुटणार आहेत, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यावेळी म्हणाले. ं


कार्यक्रमास संतोष नलवडे, शांताराम नलवडे, रुपाली नलवडे, अनिल महाडीक, नंदकुमार काटे, दिलीप कुर्‍हाडे, रवी माने, रामचंद्र नलवडे, राजू चौगुले, लता पवार, सागर चौगुले, संदीप चौगुले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.