Breaking News

निवासी शाळेत विद्यार्थीनीवर प्रभारी मुख्याध्यापकाचा अत्याचार?


बुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या खोलीतून रात्री एका मुलीला निघताना पाहिले, अशी तोंडी तक्रार शाळेतील 2 अल्पवयीन विद्यार्थिनींनी पोलिसांकडे केली. मुख्याध्यापक शाळेतून काढण्याची धमकी देत मानसिक छळ करत असल्याची तक्रार 2 अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकाने समाज कल्याण विभाग, पोलीस विभागासह विविध विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे अनु.जाती, जमाती मुलींच्या निवासी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचा संशय या प्रकरणाच्या तपासासाठी आलेल्या महिला पोलीस अधिकार्‍यांनी वर्तवला आहे. तसेच पोलीस विभागामार्फत शाळेत लावण्यात आलेल्या तक्रार पेट्यांमध्ये 12 ते 15 तक्रारी निघाल्यानंतरही पोलीस, समाज कल्याण विभाग त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणातील प्रभारी मुख्याध्यापकाचे संजय भोसले हे गेल्या 5 वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून या शाळेवर कार्यरत आहे. मात्र, नियम झुगारून ते घाटपूरी येथील मुलींच्या निवासी शाळेतील निवासात राहत होते. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेत 190 विद्यार्थिनी आहेत. याठिकाणी 2 महिला शिक्षक आणि 2 पुरुष शिक्षक आहेत. तर 4 महिला कर्मचारी आणि 1 पुरुष कर्मचारी आहे. येथील मुलींनी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका मुलीला मुख्याध्यापकांच्या खोलीतून तोंडाला कपडा बांधून बाहेर पडताना पाहिले. मुलींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तोंडी तक्रार दिली. शिवाजी नगर आणि शहर पोलिसांनी मुलींची महिला पोलीस कर्मचार्‍यांकडून चौकशी केली. त्यामध्ये मुलींनी होत असलेला सर्व प्रकार सांगितला. यापैकी एका मुलीने पोलीस उपनिरीक्षक मंगला वाकोडे यांना बंद खोलीत शाळेत घडत असलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून या शाळेतील मुलींवर लैंगिक शोषण होत असल्याचा धोका त्यांनी वर्तवला आहे. तक्रार केल्यामुळे 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना मुख्याध्यापक संजय भोसले यांच्याकडून मानसिक त्रास देण्यात येत आहे. त्यांना शाळेतून काढण्याची धमकी देवून त्यांच्या पालकांना शिवीगाळ केली जात आहे. तसेच या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींचा शाळेतील 2 सुरक्षा रक्षकांकडून पाठलाग केला जातो. इतर मुलींशी बोलल्यास त्यांना रागावण्यात येते. त्यामुळे या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत.


ही मुलींची निवासी शाळा असल्याने पुरुष मुख्याध्यापक गेल्या 5 वर्षापासून तिथे कसे असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे, तर तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीचे प्रमुख मनोज मेरत असून सुट्टीवर असल्याने चौकशीला विलंब होत आहे. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. लेखी तक्रारीला पंधरा दिवस झाले आहे. चौकशी होईपर्यंत प्रभारी मुख्याध्यापकांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे मात्र, या प्रकरणाला 2 महिने उलटूनही मनोज मेरत यांनी बुलडाणा समाज कल्याणला अहवाल पाठवला नसल्याचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी सांगितले. तर आमच्या जवळ तक्रार नसून फक्त प्रतिलिपी आहे, असे शिवाजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांचे म्हणणे आहे. समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आणि ठाणेदार रवींद्र देशमुख हे मुख्याध्यापक संजय भोसले यांना पाठीशी का घालत आहेत, हा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. तर सध्या निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर झाला असल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


तक्रारीमध्ये सत्यता नाही :

मुख्याध्यापक संजय भोसले मुलींनी केलेल्या तक्रारींमध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही. तक्रार केलेल्या सर्व मुली सध्या आमच्याकडे शिकत आहे. यावर्षी कोणत्याही मुलीचा आम्ही दाखला दिलेला नाही. तसेच अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप माझ्याकडे किंवा शाळेतील वार्डन्सकडे आलेली नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शाळेची गोपनीय तपासणी झालेली आहे. आमच्याकडे तक्रार पेटी लावण्यात आली असून दीड महिन्यानंतरही तक्रार पेटी उघडण्यात आलेली नाही. मुलींच्या कोणत्याच तक्रारीची आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही. अशी प्रतिक्रिया प्रभारी मुख्याध्यापक संजय भोसले यांनी दिली.