Breaking News

अर्जून मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर

औंध (प्रतिनिधी) : डिस्कळ (ता. खटाव) येथील राहिवासी व पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जून हरिबा मोहिते यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे राष्ट्रपतींचे पराक्रम पदक जाहीर केले आहे.

आपल्या कर्तव्य काळात व गडचिरोली येथे चार वर्षांपूर्वी नक्षलविरोधी अभियानात दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमाची दखल घेत हे पदक त्यांना जाहीर झाले आहे. श्री. मोहिते यांची पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आली होती. धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सावरगांव पोलिस ठाण्याचे प्रभारीपद त्यांना देण्यात आले होते. त्यावेळी प्रसंगावधान दाखवत नक्षलवाद्यांना अटक करून व काही नक्षलवाद्यांना शरणागती पत्करण्यास त्यांनी भाग पाडले होते. नक्षलवाद्यांनी सावरगांव पोलिस स्टेशनमध्ये रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. तो हल्ला मोठ्या शौर्याने व धैर्याने धुडकावून लावला होता. 

या सर्व घटनांची नोंद घेत वरिष्ठांनी सहायक पोलीस निरीक्षक अर्जून हरिबा मोहिते यांना पराक्रम पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक तसेच गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व सध्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.