Breaking News

मतदार यादीतील स्वत:च्या नावांची खात्री करावी : सिंघल


सातारा(प्रतिनिधी): प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली नावे मतदार यादीत आहेत का, याची खात्री करावी. तसेच अधिकार्‍यांनी मतदानादिवशी प्रत्येक कर्मचार्‍याने मतदान करण्यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वसामान्यांमध्येही मतदान करणे किती आवश्यक आहे याची माहिती पटवून सांगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज मतदार जनजागृती कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पूनम मेहता यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मतदारांच्या मदतीसाठी 1950 क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल पुढे म्हणाल्या, या हेल्पलाईनच्या माध्यमातून मतदारांच्या अडी-अडचणी सोडविण्यात येणार आहे. 1950 या हेल्पलाईन क्रमांकाचा तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाची शासकीय कार्यालयांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये, शाळा, महाविद्यालयांमध्ये माहिती द्यावी. प्रत्येक मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना ईव्हिएम व्हिव्हिपॅट ची ओळख व्हावी यासाठी ईव्हिएम व्हिव्हिपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून प्रात्यक्षिकांसाठी तारखा कळवाव्यात. येत्या 25 जानेवारी रोजी मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय विभागांनी सहभाग नोंदवावा. या दिनानिमित्त कार्यालयात शपथ घ्यावी, असे आवाहन सिंघल यांनी केले.