Breaking News

ग्लोबल नाँलेज एक्स्पो नावारुपास येईल ना. चंद्रकांत पाटील यांचे उदघाटनप्रसंगी प्रतिपादन


कराड, (प्रतिनिधी) : आगामी काळात उंब्रजचे ग्लोबल एक्सपो प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात नावारुपास येईल. त्यासाठी लागणारी सर्वातोपरी मदत आपण करूच आणि ग्लोबल नॉलेज एक्स्पोला उदघाटनासाठी पुढल्या वर्षी निश्‍चीतच मुख्यमंत्री येतील, असे राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

 उंब्रज (ता. कराड) येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित ग्लोबल नॉलेज एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मनोजदादा घोरपडे, महेशकुमार जाधव, समृद्धी जाधव, रामकृष्ण वेताळ, विशाल शेजवळ यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

 ना. पाटील म्हणाले, महेशकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून एक चांगला उपक्रम या नॉलेज एक्सपोच्या माध्यमातून साकारला जात असून सर्वसामान्यांना एकाच छताखाली नानाविध विषयांचे ज्ञान मिळवून देण्यासाठी सध्या आणि भविष्यातही त्याचा नक्कीच उपयोग होईल. अशा प्रदर्शनांमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेलाही चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी घडवलेली उपकरणे समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम करतील. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कौशल्यविकास कसे राबवता येईल, यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असून जास्तीत जास्त लोकांना काम व चांगले पैसे मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ना. पाटील यांनी या वेळी सांगितले. ग्लोबल इंग्लिश कॉलेजचे चेअरमन महेशकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समृध्दी जाधव यांनी सूत्रसंचालन, तर विशाल शेजवळ यांनी आभार मानले.