Breaking News

हॉटेलच्या आगीत 17 जणांचा मृत्यू


नवी दिल्लीः दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या समयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली.

आता ही आग शमवण्यात आली आहे. चार तास चाललेल्या बचाव मोहिमे दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी 50 जणांची सुटका केली. दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जणांना रुग्णालयात आणले, त्या वेळी मृत घोषित करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाडया लगेच घटनास्थळी रवाना झाल्या. सकाळी 7.30 च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आठ वाजल्यापासून कुलिंग ऑपरेशन सुरु झाले. अर्पित पॅलेस या तीन मजली हॉटेलमधील सर्वच्या सर्व 35 रुम बुक होत्या. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही; पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामुळे झाले आहेत.

घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उडया मारल्या असे मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या, जेणेकरुन धूर बाहेर जाईल.