Breaking News

सोनिया गांधी तंत्रनिकेतन’ च्या 25 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

 
श्रीगोंदे/प्रतिनिधी :शहरातील सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हअंतर्गत कार्बोरेटर निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या स्पॅको व बांधकाम क्षेत्रातील एबिल या कंपनीने सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या तब्बल 25 विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकर्‍यांसाठी निवड केली आहे.

 मागील अनेक वर्षापासून सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना अनेक नामांकित कंपन्यामध्ये नोकर्‍या मिळवून देण्यासाठी यश मिळत आहे. स्पॅको व एबिल या कंपनीने निवड केलेल्यांमध्ये गणेश झेंडे, आदेश आवारे, निखील लगड, अविनाश गोलांडे, शुभम जामदार, आशुतोष नलगे, निलेश नवले, ऋषिकेश वाडगे, प्रमोद येडके, तुषार देवकाते, गणेश घोलप, गणेश इंगावले, विशाल पारखे, महेश बनगे यांचा समावेश आहे.

 सोनिया गांधी तंत्रनिकेतनने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे मार्गदर्शनाखाली नियमित अभ्यासक्रमाबरोबरच मुलाखतीचे तंत्र, संभाषण कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा, अचुकता, दुसर्याप्रती आदरयुक्त भावना, आपापल्या विद्याशाखेतील आधुनिक ज्ञान, सामान्य ज्ञान, चालु घडामोडींबाबत अध्यावत माहीती अशा व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलुंची रुजवण करण्यात येते. पुढील काही दिवसात अनेक नामांकित कंपन्या परीसर मुलाखतीसाठी येणार असल्याची माहीती प्राचार्यांनी दिली.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, विश्‍वस्त अनुराधा नागवडे, निरीक्षक गोलांडे एस.पी,प्राचार्य अमोल नागवडे सर्व विभागप्रमुख तसेच ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रमुख प्रा.सचिन जठार आदींनी अभिनंदन केले.

 ग्रामीण भागातील नवयुवक, युवतींना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविणे हे स्व.शिवाजीराव (बापु) नागवडे यांचे स्वप्न होते. ते विद्यार्थ्यांना मिळणार्‍या नोकर्‍यांवरुन सत्यात उतरले आहे .त्यामुळे सर्वसामान्य कुटूंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने समाधान वाटते आणि आनंद होतो. अनुराधा नागवडे (सभापती: महिला व बालकल्याण समिती,अ.नगर)