Breaking News

तणनाशक फवारून 4 एकर ऊस जाळण्याचा प्रयत्न; 6 लाखांचे नुकसान


भेंडे/प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातील आदर्शगाव वडुले येथील शेतकरी संदीप ज्ञानदेव भागवत यांच्या शेतातील खोडवा ऊसा पिकावर अज्ञात व्यक्तीने तणनाशक फवारून 4 एकर ऊस जाळण्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदर्शगाव वडुले येथील संदीप ज्ञानदेव भागवत यांचे शेत गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. भागवत कुटुंबीय गावात रहात आहे. त्यांच्या शेती गट नं 114/2 मध्ये असलेल्या 4 एकर 265 जातीच्या खोडवा ऊसावर अज्ञातांनी तीव्र स्वरूपाचे तणनाशक फवारून ऊस जाळला आहे. ही घटना काल भागवत यांच्या लक्षात आली. ऊसावर दोन तीन दिवसात टप्प्याटप्प्याने तणनाशक फवारल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऊस पीक टप्प्याटप्य्याने जळत आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान संदीप भागवत यांनी नेवासे पोलिस ठाण्यात याबाबद लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, मी मौजे वडुले येथील कायमचा रहिवासी असून मी माझे वडील, भाऊ, पत्नी मुलासह रहात आहे. माझे वडुले गांवात गट नं.114/2 मध्ये 4 एकर क्षेत्रावर 265 या जातीचा ऊस खोडवा साधारण 3 ते 4 महिन्याचे ऊस पीक आहे.

घटनेच्या आधी दि.11 फेब्रुवारी रोजी मी शेतावर ऊसाला पाणी देण्यासाठी गेलो असता मला असे दिसून आले की, ऊसाचे खोडवा पिक अचानक पिवळे पडून जळून गेल्यासारखे जाणवत आहे. व ते पुन्हा सुस्थितीत येण्याची शक्यता वाटत नाही. सदर घटना पहाता असे लक्षात येते की, माझ्या शेतातील ऊस पिकावर अज्ञात इसमांनी तणनाशक फवारणी केली आहे. परंतू सदरील अज्ञात इसम कोण आहेत, या बाबत मी शोध घेतला असता ते मला अद्याप कळालेले नाही. सदर ऊस जळाल्यामुळे माझे अंदाजे रुपये 5 ते 6 लाखाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे. माझे कुटुंब हे शेतीवरच अवलंबुन आहे. तरी याची गंभीर दखल घेवून सदर अज्ञान इसमांची चौकशी करुन त्यांचे विरुध्द गुन्हा नोंदवून व कडक करवाई करुन मला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. व या ऊस पिकाचा पंचनमा करून मदत करावी. अशी मागणी कृषी अधिकारी, पंचायत समिती नेवासे यांच्याकडे केली आहे.