Breaking News

बारामतीतही भाजपचाच डंका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा; लोकसभेच्या 43 जागा जिंकू


पुणे / प्रतिनिधीः
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही राज्यातील सर्व 48 जागा पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. गेल्या वेळी आम्ही 42 जागा जिंकल्या. आता 43 जागा जिंकणार असून त्यात बारामतीचा समावेश असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मागील निवडणुकीत कमळ चिन्ह असते, तर भाजपने जागा जिंकली असती. आगामी निवडणूक काहींना स्वत:चे भवितव्य आणि मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी लढवायची आहे; मात्र भाजपला ही निवडणूक देशाचा विकास करण्यासाठी व देशाचे भविष्य बदलण्यासाठी लढवायची आहे. चीनला मागे टाकून भारत पुढे जाईल, अशी आज देशाची परिस्थिती आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे सरकार फक्त येणारे दिवस काढत होते. कोणतेच काम करत नव्हते. कोणतेही निर्णय घेत नव्हते; मात्र पंतप्रधान मोदी एकही दिवस न शांत बसता अविरत काम करत आहेत. एकविसाव्या शतकातील भारताची मुहुर्तमेढ अटलबिहारी वाजपेयी यांनी रोवली; मात्र दहा वर्ष आलेल्या काँग्रेसच्या राजवटीने देशाचा विकास रोखला. आज मोदी यांनी पुन्हा देशाला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे.’’

जगातील प्रत्येक देश आज भारताची एकविसाव्या शतकाकडे यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे म्हणत आहेत. नुकतेच सादर झालेला केंद्राचा अर्थसंकल्प अनेक वर्षे भारतावर प्रभाव पाडणारा आहे. भविष्यातील भारताचे चित्र दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. आमचा बुथप्रमुख छत्रपतींच्या मावळ्यासारखा आहे. याच मावळ्याच्या जिवावर आम्ही लढाई जिंकणार आहोत. अफजल खान जरी आज जिवंत नसला, तरी अफजल खानाच्या प्रवृत्तीचे लोक आज आहेत. त्यामुळे आज आपणास या अफजल खानांचा पराभव करून निवडणूकरुपी लढाई जिंकायची आहे. त्यामुळे बुथप्रमुखांनी मावळ्यांसारखे काम करून आपापले बुथ संभाळले पाहिजेत. आम्ही कुणाला आमदार, खासदार करण्यासाठी लढत नाही, तर देश आणि देशातील नागरिकांसाठी लढणार आहोत. पुणे शहरही बदलण्याचे काम आम्ही केले आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

राज्यघटना बदलण्याचा आरोप चुकीचा

या वेळी दानवे म्हणाले, की पंतप्रधानपदाची जागाच खाली नाही. त्यामुळे विरोधकांचे घोडे मध्येच थांबणार आहे. विकासाकडील लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आम्ही राज्यघटना बदलणार असल्याचे सांगितले जाते. त्यांना आज बाबासाहेबांबद्दल प्रेम येत आहे. त्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखताना आणि निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव करताना हे प्रेम कोठे गेले होते, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या वेळी केला.