Breaking News

वावदरेच्या उमेश जगताप यांना एअर स्टाफ कॉमन्डेशन पदक


सज्जनगड (प्रतिनिधी) : सातारा म्हंटल की ऐतिहासिक भूमी अन् शूरवीरांची भूमी व स्वातंत्र्यासाठी लढा देणारी भूमी म्हणून सर्वत्र ओळख आहे. या भूमीतून अनेक शूरवीरांनी जन्म घेऊन जनतेच्या सुरक्षितेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. याच भूमीचे सुपुत्र व सातारा तालुक्यातील वावदरे गावातील वायुरक्षा प्रणाली संचालक सार्जंट उमेश श्रीरंग जगताप यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रजासत्ताकदिनी सर्वोच्च पदक भारतीय सेनेच्या अध्यक्षाद्वारे प्रदान करण्यात आले.

गतवर्षी चिंचोटी धबधब्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात मदत असो किंवा केरळमध्ये लोकांना मदतीची रसद पोहचवण्याचे काम असो, मोठ्या शिताफीने या सर्व जबाबदार्‍या पूर्ण करण्यात यश मिळवलेले उमेश जगताप हे सन 2004 मध्ये भारतीय वायूसेनेमध्ये भरती झाले. शालेय शिक्षणातही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. त्याचबरोबर भारतीय वायूसेना भरती ट्रेनिंगही बेळगाव आणि बेंगळूर या ठिकाणी देऊन शिलाँग, मेघालय , पंजाब, अंदमान निकोबार, पटीयाला, मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी उत्तमरित्या कामगिरी बजावली आहे.

जगताप हे गेली चौदा वर्षे अनेक मोहिमांमध्ये सातत्याने अग्रेसर राहिले आहेत. कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकपणाच्या तत्त्वांवर वेळोवेळी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. वडील श्रीरंग जगताप, आजोबा दगडू जगताप, चुलते हणमंत जगताप हे पूर्वी आर्मीमध्ये कार्यरत असल्याने त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत उमेश जगताप हे भारतीय वायुसेनेत दाखल झाले.

कामांमध्ये असामान्य रितीने व कर्तव्यनिष्ठा दाखवत स्वतःचा व परिवाराचा विचार न करता सर्वोतोपरी देशसेवेला प्राधान्य देऊन प्रामाणिकपणा संयम आणि सारासार विचारप्रणालीचा सुयोग संगम करून आपल्या देशाचे पांग फेडण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांना भारतीय वायुसेना अध्यक्षांद्वारे चीफ ऑफ एअर स्टाफ कॉमन्डेशन बहाल करण्यात आले. या पदकांमुळे तसेच त्यांच्या कार्याबद्दल सातार्‍यासह परळी खोर्‍यात त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.