Breaking News

खंडाळा घाट दरोडाप्रकरणी सोलापूरच्या चौघांना अटक


सातारा (प्रतिनिधी) : खंडाळा घाटात काही दिवसांपूर्वी टेम्पो अडवून चालकाला बेदम मारहाण करून टेम्पो चोरून नेल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. ज्यांना अटक करण्यात आली आहे, ते कर्जबाजारी असून यातूनच त्यांनी ही चोरी केली होती. या संशयितांकडून एकूण 20 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश सिद्राम मनदुरकर (वय 30, रा. काडादी चाळ, सोलापूर), रविराज काशिनाथ मोरे (वय 36, रा. यशनगर, सोलापूर), विनोद रमेश पाटील (वय 24, रा.काडादी, सोलापूर) व विनायक विश्‍वनाथ (वय 25 , रा.काडादी चाळ, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. 6 रोजी खंडाळा घाटात टेम्पोला कार आडवी मारून कारमधील या चौघांनी चालकाला मारहाण केली. यापैकी एकाने टेम्पो ताब्यात घेऊन पोबारा केला होता. तर चालकाला कारमध्ये बसवून सालपे घाटात सोडून दिले होते. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एलसीबीकडून तपास सुरू असतानाच पोलिस उपनिरीक्षक सागर गवसणे हे महाबळेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना महाड नाक्यावर चार इसम संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. यानुसार गवसणे व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचला.

वर्णन केलेली गाडी आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने संबधित गाडी अडवून चौघांकडे चौकशी केली असता टेम्पो चोरी केली असल्याची कबुली देत हा टेम्पो विक्री करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. याचप्रकारे पुणे जिल्ह्यातील थेऊर गावच्या हद्दीत लोणीकंद रोडवर एका ट्रकचालकाला अडवून त्याला लुटले असल्याचे कबुल केले.

या चौघांकडून खंडाळा घाटातील चोरी केलेला टेम्पो, चोरी करण्यासाठी वापरात आलेली कार व इतर साहित्य असा 20 लाख 11 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत पोनि विजय कुंभार, सपोनि गजानन कदम, हवालदार विलास नागे, ज्योतीराम बने, पोना मोहन नाचण, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रशांत अहिरे, प्रविण कडव, मयुर देशमुख, सुशांत कदम, मारूती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.