Breaking News

अशोक चव्हाण ज्योतिषी! मुख्यमंत्र्यांची टीका; महाराष्ट्रात ठरल्यावेळीच विधानसभेची निवडणूक


मुंबई / औरंगाबादः
विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असें सूतोवाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे म्हटले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘अशोकरावांना पक्षात काम राहिले नसल्याने ते भाकिते करायला लागले आहेत. ज्योतिषीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे,’ अशी टीका करून विधानसभेच्या निवडणुका ठरल्यावेळीच होतील, असे स्पष्ट केले आहे.


औरंगाबादमध्ये चव्हाण यांनी ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील. त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- शिवसेनेला पाडा,’ असे आवाहन केले होते. चव्हाण यांनी या वेळी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या. चव्हाण यांच्या या वक्तव्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बैठका सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी उमेदवारांची यादी देखील तयार केली आहे. केवळ बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येणार ही नाही याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांनी लोकसभे सोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जाते.

या पार्श्‍वभूमीवर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले.