Breaking News

पाटण तालुक्यात गणेश जयंती भक्तिभावाने उत्साहात साजरी


पाटण (प्रतिनिधी) : नाडे (ता. पाटण) येथील सुवर्ण गणेश मंदिरात नुकतीच गणेश जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच होम हवण, पूजाअर्चा करण्यात आली. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शक्ती, भक्ती व बुध्दीची आराध्य देवता म्हणून श्रीगणेशाची भक्तिभावाने सर्वत्र पूजा अर्चा केली जाते. पाटण तालुक्यातील पाटण मरळी मल्हारपेठ, नाडे नवारस्ता या ठिकाणी श्रींची मंदिरे आहेत. या सर्वच ठिकाणी गणेश जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नवारस्ता परिसरातील नाडे येथे सुवर्ण गणेश मंदिराचा पहिला वर्धापन दिन व गणेश जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षापुर्वी नव्यानेच नाडे येथील भक्त गणेश शिंदे यांच्या पुढाकाराने व ग्रामस्थाच्या सहकार्याने दाक्षिणात्य मंदिराच्या प्रतिकृतीत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलि आहे. कराड - पाटण मार्गालगतच हे मंदिर असल्याने कोकणात जाणारे भाविक भक्त दर्शनासाठी येथे नेहमीच थांबतात. निसर्गरम्य परिसरात मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. गणेश जयंतीचे औचित्य साधुन शुक्रवारी पहाटे सहा वाजलेपासूनच श्रींचा महाअभिषेक, 7 ते 8 महायज्ञ, 11 ते 12 यावेळेत जन्मकाळ व पाळणा आणि त्यानंतर महाआरती व दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी नऊ वाजता व गुरूवर्य वेदांतचार्य कृष्णानंद शास्त्री महाराज कोल्हापूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.