Breaking News

अ‍ॅड. आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावे; आठवले यांचा सल्ला; वंचित आघाडीला यश येणार नाही


सोलापूर / प्रतिनिधीः
सत्तेची स्वप्न पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असल्याने मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे; परंतु सत्ता कशी मिळवावी, हे त्यांनी माझ्याकडून शिकावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. वंचित आघाडीला फारसे यश मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

आठवले म्हणाले, की अ‍ॅड. आंबेडकर यांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून सत्तेचे स्वप्न पाहू नये. मागासवर्गीय मतांचे विभाजन होणार असल्याने त्याचा फायदा भाजप -शिवसेनेला होणार आहे. वंचित आघाडीत सर्व जातीच्या नेत्यांना सामावून घेतले असले, तरी 2009च्या माझ्या अनुभवानुसार डोक्यात हवा व पैसा असणारे लोकच वंचित आघाडीकडे जातील. त्यामुळे या आघाडीला राज्यात फारसे यश मिळणार नाही. रिपाइं व वंचित आघाडीचा राजकीय समझोता होऊ शकेल काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले, की ऐक्याची माझी तयारी आहे. मागे दोन ते तीन वेळा असे प्रयत्न झाले आहेत. मात्र, त्यांनी तयारी दर्शवली नाही. दोघे एकत्र आलो तर आंबेडकर मंत्री होतील. रिपाइं ऐक्य होत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात दोघेही छाप पाडू शकतो. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करण्यास तयार आहे; पण सत्तेची स्वप्ने पाहताना राजकारणाची हवा कोणत्या बाजूने सुरू आहे, ते पाहून निर्णय घेतला पाहिजे. त्यांनीच आता भाजप-शिवसेनेसोबत यावे.

राफेलची 1600 कोटी रुपये किंमत फ्रान्स सरकारने ठरवली आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. असे असताना राहुल गांधी मात्र पुन्हा पुन्हा राफेल राफेल करून देशभरातील जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप आठवले यांनी केला. गांधी परिवार देशातील वातावरण जाणीवपूर्वक गढूळ करत आहे. मोदी यांना कितीही टार्गेट केले जात असले, तरी या सर्व प्रकारांमुळे मोदी यांचीच ताकद वाढली. भारतीय रिपब्लीकन पक्ष मोदी यांच्याच पाठीशी आहे, असे त्यांन सांगितले.

पवार लोकसभा लढणार नाहीत

शरद पवार माझ्या विरोधात लढणार नाहीत. इतकेच नव्हे तर विजयसिंह मोहिते - पाटील माढयात असल्याने पवार तेथे येणार नाहीत असे आठवले यांनी सांगितले. पंढरपूरचे आपण एकदा खासदार होतो. शिर्डीत धोका झाला आणि आपला पराभव झाला; परंतु माढामधून आपण निवडून आलो असतो, असे ते म्हणाले.