Breaking News

त्रिवेणी साहित्य संगम संमेलनास वाईत शानदार प्रारंभ


वाई (तर्कतीर्थनगरी ) : विनोदाला कारुण्याचे तत्वज्ञान देणारे पुलं तथा भाई, गीतांना चित्रभाषा देणारे गदिमा व शब्दांना स्वर सौंदर्य देणारे बाबूजी ही तीन व्यक्तिमत्वे मराठी सारस्वतांच्या दरबारातील हे दीप स्तंभ आहे. यांनी मराठी मन घडवले व संपान केले या तिघांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष मराठी विशवकोषाच्या निर्मिती मंडळाने त्रिवेणी संगमाचे आयोजन केले याची जाणीव महाराष्ट्र कदापी विसणार नाही, असे उदगार अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे यांनी उदघाटनपर भाषणात व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोष मंडळ आयोजित त्रिवेणी साहित्य संगमाच्या कार्यक्रमात त्या उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी विश्‍वकोशाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, शिक्षण विभागाच्या सहसचिव अपर्णा साठे, राजेश क्षीरसागर, तहसीलदार रमेश शेडगे, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे, महाराष्ट्र बँकेच्या शाखाप्रमुख प्राची देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ढेरे पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या घराघरात गीत रामायण पोहचवणारे गदिमा व बाबूजी हे केवळ पटकथा लेखक व गीतकार नव्हते, तर साहित्याच्या सर्व क्षेत्रात संचार करणारे कवी होते, गीतकार होते, दिग्दर्शक होते. सरस्वतीची पूजा करणार्‍या मराठी सारस्वताचे हे पुत्र उभे आयुष्य संघर्षातच जगले. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वावर ग्रामीण व नागरी भाषांचा प्रभाव होता. कुंडल, किर्लोस्करवाडी व औंध या ग्रामीण संस्कृतीचे वर्णन त्यांच्या लेखनांमधून आढळून येते, असे सांगून अरुणा ढेरे म्हणाल्या की, साहित्यीकांच्या वाट्याला क्वचितच घरोघरी पोहोचण्याचे भाग्य लाभते. या तिघांना महाराष्ट्राने स्वीकारले, त्यांचे शब्द त्यांचे स्वर व त्यांचा विनोद मनात, कानात, व ज्ञानात साठविले, त्यामुळेच महाराष्ट्र भावगीतांच्या संगीत संस्कृतीने घडला. विनोदाने खळखळून हसला या तीन व्यक्तिमत्वाच्या काल खनडातील महाराष्ट्र हा प्रतिभेचा उच्च अनुभव होता. सांस्कृतिच्या अभिरुचीच्या प्रसाराचा तो कालखंड होता. गीतांना भक्तिभाव व मान्यता ही सर्व श्रेष्ठ म्हणून मिळाल्याचा तो कालखंड हे गदिमा व बाबूजींनी संयुक्त देणगीचा सुगंध मराठीत दरवळत राहील असेही अरुणाताई ढेरे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा सिंडे यांनी आपल्या भाषणात आजचे साहित्य संमेलन ही वाई करांसाठी एक पर्वणी असून संत येता घरी या उक्ती प्रमाणे साहित्यिकांचे पाय वाई च्या मातीला लागले असून हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. प्रारंभी अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते मराठी सूचीखंड प्रकाशन, ज्ञानमंडळ संकेतस्थळ व कुमार विश्‍वकोष (जीवसृष्टी व पर्यावरण) भाग 3 चे लोकार्पण सोहळा पार पडला.

प्रास्ताविक दिलीप करंबेळकर यांनी केले. सूत्रसंचालन लेखिका विजया देसाई यांनी केले. तर आभार सचिव शामकांत देवरे यांनी मानले. प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये साहित्यिक,विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारच्या सत्रात प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी ग.दि. माडगूळकर यांची प्रतिभासृष्टी या विषयावर साहित्यिका विनया बापट, शरद कुमार फडके, गायिका फैय्याज शेख यांची प्रकट मुलाखत घेतली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग.दि.माडगूळकर तथा ग.दि.मा, सुधीर फडके तथा बाबूजी, कानी पु.ल.देशपांडे तथा पुल, या महाराष्ट्राच्या तीन लाडक्या व्यक्तिमत्वाचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त दक्षिण काशी वाई नगरीत त्रिवेणी साहित्य संगम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण व सांस्कृतिक मंत्री ना.विनोद तावडे यांच्या अधिकारांतर्गत मराठी भाषा विभाग येतो. आजच्या या साहित्य क्षेत्रातील कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थितीती अपेक्षित होते. मात्र त्यांनी व जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने कार्यक्रम स्थळी अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.