Breaking News

चाफळ ग्रामपंचायतीत अफरातफर


कराड (प्रतिनिधी): पाटण तालुक्यात राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजलेल्या तीर्थक्षेत्र चाफळ, येथील ग्रामपंचायतीत लाखो रुपयाची अफरातफर केल्याचे सातारा जिल्हा परिषदेच्या लेखा परीक्षण तपासणीत उघडकीस आले असून या अफरातफरीची खातेनिहाय चौकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी पाटणच्या गटविकास अधिकार्‍यांना दिल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाफळ, ता. पाटण येथील ग्रामपंचायतीने सन 2016-17 या आर्थीक वर्षात ग्राम निधीत 7 लाख 7 हजार 110 रुपयाची अफरातफर केल्याची बाब सातारा जिल्हा परिषद लेखा परीक्षण तपासणी दरम्यान उघडकिस आल्याने याबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे. चाफळ ग्रामपंचायतीवर प्रथम दर्शनी अफरातफर केल्याचा ठफका ठेवत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पाटणचे गटविकास अधिकारी गायकवाड यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून चाफळची संपूर्ण पाटण तालुक्यात ओळख आहे. मध्यंतरीची पंचवार्षिक निवडणुक वगळता ग्रामपंचायत स्थापनेपासून येथे विद्यमान आमदार शंभूराज देसाई गटाचीच सत्ता आहे. अलिकडच्या काळात या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरलेल्या या ग्रामपंचायतीवर प्रशासनाने लाखो रुपयाची अफरातफर केल्याचा ठपका ठेवला आहे. या अफरातफर प्रकरणाने संपूर्ण पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.