Breaking News

एव्हरेस्टवीर प्रियांका मोहितेला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर


सातारा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने नुकतीच शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सातार्‍यातील एव्हरेस्टवीर प्रियांका मोहिते हिला साहसी पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवार, दि. 17 रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे होणार्‍या कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रियांकाला प्रदान करण्यात येणार आहे.

प्रियांका मोहिते हिने शिक्षण घेत असतानाच वयाच्या 21 व्या वर्षी जगातील सर्वात उंच समजले जाणारे माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर केले होते. त्याचबरोबर जगातील चौथ्या क्रमांचे परंतु चढाईला अवघड असणारे ल्होत्से हे शिखरही तिने सर केले होते. हे शिखर सर केल्यानंतर सर्वात लहान असलेली पहिली भारतीय महिला म्हणून तीने मान पटकावला आहे. तिच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रात तिने सातार्‍याचा नावलौकीक वाढवला आहे.
महाराष्ट्रातून एव्हरेस्ट सर करणार्‍यामध्ये तिचा नंबर लागला आहे. राज्य सरकारने याच कामगिरीची दखल घेऊन नुकतेच सन 2017 -18 च्या शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये तिला स्थान दिले आहे. अशी अचाट कामगिरी केल्याबद्दल साहसी पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात येणार आहे.