Breaking News

सातार्‍यात ‘सामाजिक न्याय भवन’चे लोकार्पण


सातारा (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या सातार्‍यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तसेच शिरवळ व दहिवडीतील मुलींचे शासकीय वसतिगृह, म्हसवडमधील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळा या इमारतींचे उद्घाटन गुरूवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बॉम्बे रेस्टॉरेंट उड्डानपुलाजवळ, सातारा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे.

समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त् सचिन कवले यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, सदरचा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, पालकमंत्री विजय शिवतारे, सातार्‍याचेे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

सातार्‍यात दि. 14 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणार्‍या सामाजिक न्याय भवन मध्ये ‘अ’ भागात सामाजिक न्याय विभाग कार्यालय आणि जात पडताळणी कार्यालय तर ‘ब’ भागात संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, अपंग व वित्त विकास महामंडळ ही सहा कार्यालये या इमारतीत असतील, अशी माहितीही श्री. कवले यांनी या वेळी दिली.