Breaking News

पोलिस, महसूल यंत्रणेविरोधात रघुनाथराजेंची लवादाकडे दाद


फलटण (प्रतिनिधी ):वाळू माफियांना सहकार्य करणार्‍या पोलीस व महसूल यंत्रणेविरुद्ध फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यावतीने हरित लवादाकडे दाद मागितली आहे. याबाबतची नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी,फलटण यांना पाठविण्यात आली आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फलटण तालुक्यात वाळू माफियांनी एवढा उच्छाद मांडला आहे की, या वाळू माफियांमुळे शेतकर्‍यांचे पाणी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नाही. त्याचबरोबर यामध्ये पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे. पोलीस व महसूल खाते याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना या वाळू माफियांचे हप्ते सुरु असल्याचा आरोप होत आहे. वाळू माफियांना सहकार्य करणार्‍या महसूल अधिकारी व हप्ते घेणार्‍या पोलीस प्रशासनाच्या विरोधात फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी अ‍ॅड. अमीन सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात व हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये म्हटले आहे की, फलटण तालुक्यात बाणगंगा नदी ही नैसर्गिक पाण्याची सोय करणारा मुख्य स्त्रोत आहे. तालुक्यात अनेक नाला, नहर इत्यादीद्वारे शेतीचे सिंचन केले जाते. फलटण तालुक्यात आलेल्या धोम-बलकवडी कॅनॉलद्वारे शेतकर्‍यांना पाणी पोहोचविले जात आहे. परंतू वाळू माफियांनी या सर्व क्षेत्रात वाळू उपसा करुन एवढे मोठे खड्डे करून ठेवले आहेत की, धोम-बलकवडी कॅनॉलद्वारे सुटलेले पाणी तीन दिवस झाले तरी पुढे जात नाही. परिणामी शेतकर्‍यांना पिकासाठी पाणी उपलब्ध होताना बर्‍याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे कुठेतरी थांबण्यासाठी वाळू माफियांना सहकार्य करणार्‍या महसूल अधिकारी व हप्ते घेणार्‍या पोलीस प्रशानसनाच्या विरोधात याचिका दाखल केली असून ही नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसाच्यात आत आपण उल्लंघन करणार्‍या व कायद्याचे पालन न करणार्‍या, अतिक्रमण करणार्‍यां विरुद्ध त्वरीत कारवाई करुन कायदेशीर कर्तव्याची पुर्तता करावी. तसेच बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍यांवर व त्यांना पाठीशी घालणार्‍या लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी या नोटीसेद्वारे करण्यात आली आहे. वाळू माफियांच्या विरोधात व त्यांना सहकार्य करणार्‍या पोलीस व महसूल प्रशासनाच्या विरोधात नुकतीच फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती येथे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटींग बोलावून या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी या सर्वांविरुद्ध उच्च न्यायालय व हरित लवादाकडे दाद मागण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
ऑडिओ क्लिप घालतेय धुमाकूळ
फलटण तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लिप फिरत असून त्यामध्ये एक वाळू माफिया व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण आहे. यामध्ये वाळू माफियाला किती वाळूला किती हप्ता द्यावा लागेल व हा हप्ता वर कोणाकोणाला दिला जातो याचा उल्लेख आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांजरे हे रुजू झाल्यापासून वाळू माफियांना अभय दिल्याचे जाणवत असून वाळू उपसा जोरदारपणे सुरु असल्याचे दिसत आहे. वाळू उपशाला बंदी असून शासनाचा आदेश डावलून वाळूचे आपणच मालक असल्याचे अर्विभावात कोट्यावधी रुपयांच्या वाळू चोरीस हातभार लावत आहेत.