Breaking News

महाबळेश्‍वरात पुन्हा दवबिंदू गोठले


महाबळेश्‍वर (प्रतिनिधी) : अचानक काल रात्री वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे महाबळेश्‍वरातील पारा पुन्हा घसरल्याने या हंगामात दुसर्‍यांदा वेण्णालेक ते लिंगमळा या परिसरातील दवबिंदू गोठले. गोठलेल्या दबबिंदूंमुळे हा परिसर पांढरा शुभ्र दिसत होता. या आल्हाददायक वातावरणाचा पर्यटकांनी भरपूर आनंद लुटला.
कडाक्याच्या थंडीमुळे येथील पारा पुन्हा घसरला आहे. मात्र, जसजसा सूर्य वर येवू लागला, तसतसे गोठलेले दवबिंदू पुन्हा हळुहळू वितळू लागले आहे. थंडीच्या लाटेमुळे महाबळेश्‍वरातील पारादेखील चांगलाच घसरला आहे. शहर परिसरापेक्षा कमी तपमान असले तरी वेण्णालेक, गहू गेरवा संशोधन केंद्र व लिंगमळा या परिसरात पारा आणखी खाली घसरल्याने या भागातील दवबिंदूही गोठून गेले होते.

आज मोठ्या विस्तीर्ण परिसरातील दवबिंदू गोठल्याचे आढळून आले. सन 2005 मध्ये वेण्णा लेकमधील बोटींवर व बोटींच्या टपावर बर्फ साचल्याचे दिसून आले होते. यावेळी मात्र वेण्णालेकमधील बोटींच्या पॅलेटवरही गोठलेले पांढरे शुभ्र दवबिंदू स्पष्टपणे दिसून आले. महाबळेश्‍वर- पाचगणी या मुख्य रस्त्यांवर काही पर्यटकांनी आपली वाहने उभी केली होती. बगीचा कॉर्नर या हॉटेलसमोर उभ्या असणार्‍या अनेक गाडयांच्या टपांवरही दवबिंदू गोठल्याचे दिसून येत होते. दवबिंदूचे प्रमाण मोठे असल्यामुळे गाडयांच्या टपावर व कांचावर बर्फाचा थर जमला होता. पर्यटकांनी हातांनी हे गोठलेले बर्फ हातांनी गोळा केले.

दवबिंदू गोठून त्याचे बर्फात रुपांतर झाल्याची माहिती या परिसरातील हॉटेलमध्ये पसरल्याने पर्यटक हे मनोहरी दृश्य पाहण्यासाठी पहाटे पहाटेच बाहेर पडले होते. स्फटिकाप्रमाणे चमकणारे गोठलेले दवबिंदू पाहून पर्यटक हरखून गेले होते. तर अनेकजण आश्‍चर्य व्यक्त करीत होते. या भागात स्ट्रॉबेरीच्या अनेक बागा आहेत. या बागा पिकविणार्‍या शेतकर्‍यांच्या घरांच्या छप्परावर, स्टॉब्ररी पिकांच्या पानांवर व इतर पिकांवर दवबिंदू गोठल्याचे दिसून येत होते. नगरपरिषदेत फुलविलेल्या स्मृतीवनातील विस्तीर्ण पठारावरील गवतांवरही दवबिंदू गोठल्याने हा परिसर पांढरा शुभ्र झाल्याचे दिसून येत होते. जणू निसर्गानेच पांढरी शुभ्र शाल पांघरल्याचा भास हे मनोहरी दृश्य पाहणार्‍यांना होत होता. भल्या पहाटेपासून सकाळच्या पहिल्या दोन प्रहरांदरम्यान काही काळच हे दृश्य पाहता आले. त्यामुळे ज्यांना हे विलोभनीय दृश्य पाहण्याचा योग लाभला ते स्वत:ला भाग्यवान समजत आहेत.