Breaking News

गोरक्षनाथ गडावर तनपुरेंच्या हस्ते पूजा


अहमदनगर/प्रतिनिधी : “गडाला आमचे कायम सहकार्य असते व भविष्यातही राहील, धार्मिक स्थळी व अध्यात्मात आम्ही राजकारण आणत नाही, धार्मिक वृत्तीमुळे कोणाचे चांगले नाही करता आले तरी कधी कोणाचे वाईट केले नाही, येणार्‍या दुष्काळात येथील गोशाळेतील गायीच्या चारा साठवणीसाठी मदत केली जाईल’’, असे प्रतिपादन राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केले. मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर र्मनाथबीज निमित्ताने श्री. तनपुरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राजक्त तनपुरे, नेते गोविंद मोकाटे यांनी पदधिकार्‍यांसह येऊन दुपारची महापूजा व आरती केली.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. शंकरराव कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, उपाध्यक्ष जयराम कदम, सरपंच जालिंदर कदम, अन्तोष कदम, राधाकिसन भूतकर, बाबासाहेब कर्डिले, अनिल शर्मा, अशोक मते, गोरक्षनाथ महाराज ढोकणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावनाविवश होत गोविंद मोकाटे म्हणाले, “आमच्या घरी परंपरेने नवनाथ ग्रंथाचे पारायण केले जात होते व लहानपणापासून आम्ही गडावर येत होतो, चार वर्षांपासून राजकारणात पडलो व पारायण करण्याचे घरच्या मंडळींकडून राहून गेले, त्याची प्रचीती म्हणूनच की काय आम्ही सध्या वाईट परिस्थितीतून जात आहोत, आता पुन्हा पारायण सुरु करणार आहोत.’’
नंतर श्रीकांत महाराज गागरे यांचे कीर्तन झाले. गोरक्षनाथाबद्दल माहिती सांगताना ते म्हणाले, “आज तरी कीर्तनात भाविक प्रश्‍न विचारात नाहीत पण जेव्हा प्रश्‍न विचारायला सुरुवात होईल तेव्हा निम्मे कीर्तनकार घरी बसतील व कीर्तन सोडून देतील’’ असे त्यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य केले.
गडावर ऊर्जेसाठी सोलर सिस्टीम बसवण्याचे ट्रस्टने ठरवले असून धर्मनाथबीज निमित्त गडावर आलेल्या भाविकांनी त्यासाठी देणगी जाहीर केली.
एकूण 3 लाखांपेक्षा जास्त खर्च येणार असून यापैकी अनिल शर्मा यांनी 1 लाख, सुदाम तागड यांनी 50 हजार व गणेश सावंत यांनी हे पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. त्यांचाही गडाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर  दुपारी महाप्रसाद झाला. रात्री उशिरापर्यत भाविक दर्शनाला येत होते.