Breaking News

स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून पवारांची उदयनराजेंना पसंती; खासदार उदयनराजे राष्ट्रवादीकडून हॅट्रिक करणार की भाजपकडे जाणार?सातारा (प्रतिनिधी) : सातार्‍यातील राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले खासदारकीची हॅटट्रीक करण्यासाठी मैदानात उतरले असले तरी त्यांचा पक्ष कोणता? याचीच सध्या सातार्‍यासह संपूर्ण राज्यात जास्त चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी उदयनराजेच उमेदवार असतील, असा संदेश दिला आहे. नुकत्याच उदयनराजेंच्या दिल्ली दौर्‍यात याची प्रचितीही आली आहे. मात्र असे असले तरी राष्ट्रवादीतून काही डावपेच तर रचले जाणार नाहीत ना? अशी शंका उदयनराजेंना असू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आगामी काळात उदयनराजे यांच्यासमोर भाजपचाही पर्याय असण्याची शक्यता असून उदयनराजे नेमकी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, प्रतापराव भोसले, हिंदुराव नाईक, निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील, श्रीनिवास पाटील यांच्यानंतर उदयनराजे भोसलेंकडे या मतदारसंघाची सूत्रे आली. मतदारसंघात मराठा, माळी आणि धनगर या तीन समाजाचे प्राबल्य आहे. दहा वर्षांपूर्वी कृषीभूषण बुधाजीराव मुळीक यांना सोबत घेऊन उदयनराजेंनी खंडाळा ते कोयनानगर अशी पायी भूमाता दिंडी काढली होती. त्यावेळी या मतदारसंघातील प्रश्‍नांवर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने उदयनराजे यांच्याकडे गेली दहा वर्षे हा मतदारसंघ आणि विधानसभेतील बहुसंख्य मतदारसंघही याच पक्षाकडे असतानाही हे प्रश्‍न आजही तसेच रखडल्याचे दिसून येत आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा बालेकिल्ला ठरलेला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने याच पक्षाकडे आहेत. पक्षाच्या या शक्तीमुळे उदयनराजे हे मागील दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या निवडीमागे ते सांगत असलेले राजेपण जेवढे महत्त्वाचे आहे, तितकीच पक्षाची ताकद आणि शरद पवार यांनी त्यांच्यामागे लावलेली शक्तीही निर्णायक आहे. मात्र मागील पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. जिल्ह्यात भाजपाचा वारूही सुसाट सुटला आहे. तर उदयनराजे यांनी स्वपक्षाबरोबरच अनेकांची नाराजीही ओढवून घेतली आहे. आज सातारा शहर व तालुक्यापासून ते जिल्ह्यात सर्वत्र त्यांना विरोध करणारी नवी शक्तिस्थाने उभी राहिली आहेत. विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याबरोबरचे उदयनराजे यांचे वाद गेल्या काही दिवसात अगदी रस्त्यावरील हातघाईपर्यंत आलेले आहेत. लोणंद येथील खंडणी प्रकरणात त्यांना झालेली अटक, आनेवाडी टोलनाका ठेका प्रकरणावरून सातार्‍यात झालेला गदारोळ, फलटण येथे जमावाने जात रामराजे नाईक निंबाळकरांच्या घरात घुसण्याची केलेली भाषा, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच आमदार आणि प्रसंगी नेतृत्वाविरोधात वेळोवेळी केलेली वक्तव्ये या सार्‍यांमुळे उदयनराजे आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभी दरी पडलेली आहे. मागील तीन वर्षे सातारा जिल्ह्याने हा टोकाचा संघर्ष पाहिला आहे.

पक्षांतर्गत असलेला हा विरोध उदयनराजे यांच्यासाठी सध्या सर्वात नकारात्मक गोष्ट आहे. पक्षातील या नाराजीतून त्यांच्या उमेदवारीलाही छुप्या पद्धतीने विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का? मिळाली तरी ती कुठल्या पक्षाकडून? आणि त्यांनी निवडणूक लढवली तरी ते तिसर्‍यांदा विजयी होणार का याविषयी सध्या मतदारसंघात विविध मत मतांतरे व्यक्त केली जात आहेत. या सर्वात पक्षप्रमुख शरद पवार यांची भूमिका यंदाही महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे हे नक्की. पक्षांतर्गत संघर्षांमुळे उदयनराजे यांना राष्ट्रवादीत विरोध तयार झाला. मात्र याच विरोधाने अन्य पक्षात त्यांचे मित्र तयार झाले. भाजप, काँग्रेससह अन्य सर्वच पक्षातून, त्यांच्या नेत्यांकडून त्यांना अनेकदा छुपा-उघड पाठिंबा मिळत आहे हेही उघड सत्य आहे. शरद पवारांसोबत सहज वावरणारे उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांसोबत व्यासपीठावर नित्य झळकत आहेत. यामुळे त्यांनी स्वत:विषयी एक राजकीय संदिग्धता निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस ही आजही चालणारी हुकमी गोष्ट त्यांच्या बाजूने आहे. मराठा मोर्चातील त्यांचा सक्रिय सहभाग हाही त्यांना उपयोगी पडणारा ठरू शकतो. पण त्याचवेळी ‘अ‍ॅट्रॉसिटी’ आणि आरक्षणसारख्या मुद्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे अन्य समाजाकडून त्यांना फटकाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरे तर गेल्या दोन निवडणुकांपासून सातारा मतदारसंघातील निवडणूक ही उदयनराजे यांच्याभोवती फिरते आहे. इथल्या राजकीय लढाईचे सूत्र हे उदयनराजे समर्थक आणि विरोधक असेच राहिले आहे. यामुळे इथे त्यांच्या विरोधी उमेदवाराची तशी चर्चाच होत नाही. खरे तर तसा तगडा पक्ष किंवा उमेदवारही उभा राहिलेला नाही. परंतु यंदा अशीच स्थिती राहील असे नाही. उदयनराजे यांनी जर राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली तर त्यांना पक्षांतर्गत विरोधासह भाजपाचे तगडे आव्हान असण्याची शक्यता आहे. सत्ताप्राप्तीनंतर या मतदारसंघातील भाजपच्या स्थितीत आमूलाग्र बदल झालेला आहे. स्वपक्षातील आणि अन्य पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या जिवावर पक्षाने आपले पाय भक्कम केले आहेत. महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातल्याने, तसेच डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर अशा अनेक नव्या दमाच्या नेत्यांना सत्तेचे बळ मिळाल्यामुळे पक्षाची स्थिती दखल घ्यावी अशी झाली आहे. वाई- खंडाळा-महाबळेश्‍वर भागात दांडगा जनसंपर्क असलेले माजी आमदार आणि किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच त्यांच्या कारखान्याच्या या कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत जनमताचा अनोखा कौल घेतला आहे. ऐनवेळी उदयनराजे यांनाच भाजपाने उमेदवारी दिल्यास सातार्‍यातील निवडणूक अजून रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

सर्वसामान्यांना, गोरगरिबांना समोर ठेवून मतदार संघात काम केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महामार्ग, जलसिंचन, रस्त्यांची छोटीमोठी अनेक कामे मार्गी लावली. सातारा पालिका हदीत ग्रेड सेपरेटर, कास तलाव उंची आदी कामे सुरु आहेत. मतदार संघातील पालिका, नगरपंचायतींच्या विकास कामांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. समाजातील अनेक घटकांची कामे करत त्यांना न्याय मिळवून दिला. नियोजित सातारा मेडिकल महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्‍न, रेल्वे मार्ग रुंदीकरणाचा पाठपुरावा करून हे प्रश्‍न मार्गी लावले. इको सेन्सेटिव्ह झोन, हरित लवाद आदी उच्चस्तरीय सनियंत्रण समितीमुळे पर्यावरण क्षेत्रात स्थानिकांना येणार्‍या अडचणीं दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. मतदारसंघात अनेक विकास कामे व सतत जनसंपर्क यामुळे मतदार यावेळीही मलाच संधी देणार आणि मी पुन्हा पूर्वीप्रमाणेच मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असल्याची प्रतिक्रिया खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची पक्ष बांधणी आणि संघटन चांगले झाले आहे. आजमितीस साडेचार लाख मतदार पक्षाचे सदस्य आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा अनेकांना लाभ झाला आहे. पक्षाकडे लोकांचा ओढा वाढतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात संपूर्ण जिल्ह्याची सत्ता असूनही विकास रखडलेला असल्याने लोकांना आता बदल हवाय. याची प्रचीती येत्या निवडणुकीत दिसेल, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी लोकमंथनशी बोलताना म्हटले आहे.