Breaking News

अखिल भारतीय किसान सभा करणार अर्थसंकल्पाची होळी


अहमदनगर/प्रतिनिधी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बुधवार दि. 13 फेब्रुवारीस सकाळी 11:30 वाजता केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्प 2019 च्या प्रतींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी दिली.
मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतीक्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले असून शेतीसाठी कुठल्याही प्रकारची ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा, शेतकर्‍यांना दरमहा पेन्शन, भाव स्थिरता निधी याबद्दल अर्थसंकल्पात कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही.पंतप्रधान किसान सन्मान योजना म्हणजे शेतकर्‍यांच्या मूळ प्रश्‍नांशी न भिडता शुद्ध धूळफेक करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अटी पाहिल्यानंतर ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने शेतकर्‍यांना एक कमोडिटी बनवले आहे. एकप्रकारे हा मत विकत घेण्याचाच प्रकार आहे. मिळणारी 6 हजार रुपये रक्कम बघितली तर त्यामधून शेतकर्‍यांचे कुठलेच प्रश्‍न सुटू शकत नाहीत. बि-बियाणे, कृषी अवजारे व खतांच्या किंमती जीएसटीच्या बाहेर आली नाहीत त्यावर सबसिडी नाही. त्यामुळे संपूर्ण अर्थसंकल्प हा शेतकरी विरोधी असल्यामुळे या अर्थसंकल्पाची होळी करण्यात येणार आहे.आंदोलनात शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. विकास गेरंगे, सतीश निमसे, कॉ. बाबा आरगडे, कॉ.अप्पासाहेब वाबळे, कॉ. बापूराव राशीनकर, कॉ. संतोष खोडडे, कॉ. रामदास वाघस्कर, कॉ. धोंडीभाऊ सातपुते, कॉ. दीपक क्षिरसाठ, कॉ.अमोल चेमटे, कॉ.अरुण भिटे, कॉ.संतोष सोनावणे यांनी केले आहे.