Breaking News

राफेलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रणकंदन


नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत पुन्हा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रणकंदन सुरू झाले. ’द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या एका अहवालावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले. त्यामुळे संसदेतील वातावरण तापले. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावर उत्तर देताना काँग्रेससह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. वृत्तपत्राने सर्व बाबी लोकांसमोर ठेवल्या पाहिजेत असे सांगत अहवाल नाकारला. तसेच काँग्रेस जुने मुद्दे उकरून काढून राजकारण करत असल्याचा पलटवार केला.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी राफेल मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू केली. सभापती सुमित्रा महाजन यांनी प्रश्‍नोत्तरास सुरूवात केली. या वेळी काँग्रेस सदस्य इंग्रजी वृत्तपत्राची कात्रणे हातात घेऊन सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत उतरले. तसेच ’चौकीदार चोर है’ असे म्हणत घोषणाबाजी सुरू केली. या वेळी काँग्रेससोबत डावे पक्ष, तेलुगु देसम आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्यही होते. शुक्रवारी सकाळीच राहुल गांधी यांनी राफेलवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. वृत्तपत्रातील अहवालाने मोदी यांची पोलखोल झाल्याचे सिद्ध झाले असून पंतप्रधानांनी राफेलमध्ये समांतर चर्चा केल्याचा आरोप केला. यावर लोकसभेत संरक्षणमंत्र्यांनी विरोधकांवर आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि स्वत:च्या फायद्यासाठी जुने मुद्दे उकरून काढल्याचा आरोप केला. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून विविध बाबींची वेळोवेळी माहिती घेणे हस्तक्षेप होऊ शकत नाही, असे सीतारामण म्हणाल्या. तसेच वर्तमानपत्राने एकांगी वृत्त छापले असून जर वृत्तपत्राला सत्य समोर आणायचे असते, तर त्यांनी तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे याबाबतचे वक्तव्यही छापले असते, असे सीतारामण म्हणाल्या.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात सोनियांचा हस्तक्षेप?
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सल्लागार परिषदेची (एनएसी) निर्मिती करण्यात आली होती. त्या वेळी त्यांचा पंतप्रधान कार्यालयात किती हस्तक्षेप होता? एकप्रकारे पंतप्रधान कार्यालय एनएसीकडूनच चालवले जात होते, असे टीकास्त्र त्यांनी काँग्रेसवर सोडले.