Breaking News

राजापूर जिल्हा परिषद शाळेचे वर्ग झाले डिजिटल


संगमनेर/प्रतिनिधी: शाळा आणि गावामध्ये उत्तम समन्वय असेल तर त्या शाळेचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. कोणत्याही शासकीय निधीची वाट न बघता केवळ सामाजिक जाणीवेतून राजापुरच्या जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीने सर्व वर्ग डिजीटल करत सर्वांपुढे एक आदर्श ठेवल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आर.एम. कातोरे यांनी केले.

राजापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित कार्यक्रमात कातोरे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, जिल्हा परिषद सदस्य मिलींद कानवडे, नवनाथ अरगडे, विष्णु राहटळ, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, संतोष हासे, माधव हासे, बादशहा हासे आदी यावेळी उपस्थित होते.

कातोरे म्हणाले की, मानवी वाटचालीत शाळा हा आधुनिक काळातील महत्वाचा घटक आहे. यापुढील काळात शाळा तिर्थक्षेत्र बनल्या पाहिजेत. ज्या गावात शाळा ह्या मंदिरापेक्षा देखण्या आहेत. ते गाव अधिक सुसंस्कृत असते. राजापुर येथील शाळेचा बीओटी तत्वावर विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कानवडे म्हणाले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या भुलभुलय्याला पालकांनी बळी न पडता विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा नवनवे उपक्रम राबवत असून या शाळांनी आता विकासात्मक कात टाकली आहे.

नवनाथ अरगडे यांचेदेखील यावेळी भाषण झाले. शाळेचे हे शताब्दी वर्ष असल्याने मान्यवरांनी शाळेस मदत जाहिर केली. ग्रामपंचायतच्यावतीने गरिब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तर विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना कॉ. गंगाधर मोहिते नाना बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. सचिन हासे, राजेश तिकांडे, भाऊसाहेब देशमुख, गणपत सोनवणे, विजय हासे, संजय हासे, अ‍ॅड. अनिल गोडसे, देवराम हासे, चंद्रभान खतोडे आदी यावेळी उपस्थित होते. (कोट)

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल प्रणाली विकसीत होत आहे. शाळांचा कायापालट करण्यासाठी शिक्षकांसोबत ग्रामस्थांचादेखील हातभार लागत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा नवे तंत्रज्ञान आत्मसात करत करत आहे. शिक्षकांकडून नवनव्या तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर वाढत असल्याने पालकांचादेखील ओढा आता या शाळांकडे वाढतांना दिसतो.-अजय फटांगरे, सभापती कृषी समिती, अहमदनगर