Breaking News

पक्षाने उमेदवारी दिल्यास माढ्यातून लढणार : संजीवराजे


सातारा (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माढा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याची ग्वाही संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी माढा लोकसभा मतदार संघातून पक्षाने उमेदवारी दिली तर ती स्वीकारण्याची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचा जो उमेदवार दिला जाईल, त्याचे काम केले जाणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार जो निर्णय देतील, त्या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. माळेगाव बु. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी काय हितगुज केले? यावर संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, माळेगाव येथील कार्यक्रमात खा. शरद पवारांच्याबरोबर उसाच्या प्रश्‍नावर चर्चा केली. तसेच यावेळी कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

माढा लोकसभा मतदार संघातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे नाव निश्‍चित झाले आहे का? या पत्रकारांच्या प्रश्‍नावर संजीवराजे म्हणाले, अद्यापपर्यंत कुणाचेही नाव निश्‍चित झाले नाही. मात्र शरद पवार जो उमेदवार देतील, त्याचे काम केले जाणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात वेगळी परिस्थिती होती मात्र यावेळी तशी परिस्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित येवून लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यावेळी समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे उपस्थित होते.