Breaking News

हिरकणी महाराष्ट्राची कार्यक्रमात सहभाग घ्यावा : ना. सुरेश प्रभू


सातारा (प्रतिनिधी) : महिला बचत गटांच्या कल्पनांना वाव देवून त्यांना उद्योजक बनविण्यासाठी हिरकणी महाराष्ट्राची हा नवीन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. या कार्यक्रमातून स्वत:च्या गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याच्या विकासाबरोबर राज्याचा तसेच देशाचा विकास होईल, असा विश्‍वास केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला.

मुंबई येथील वॉर रुम मधून हिरकणी महाराष्ट्राची या पथदर्शी कार्यक्रमाचा शुभारंभ ना. सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर, कौशल्य विभागाचे सचिव आसिमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयात दाखविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, कौशल्य मार्गदर्शन अधिकारी संगिता खंदारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेतकर्‍यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. निसर्गाच्या लहरीपणामुळे आज दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, यावर मात करण्यासाठी लोकांकडे योजना असतील त्याला प्रोत्साहन दिले जाईल. हिरकणी महाराष्ट्राची या कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या कल्पनांना वाव देवून त्यांना उद्योजक करण्यात येणार आहे.

यातून विकासाचा दर नक्की वाढले. या योजनेला केंद्र शासनही मदत करणार असल्याचेही ना. प्रभू यांनी शेवटी सांगितले. शासनाने हिरकणी महाराष्ट्राची हा उपक्रम घेतला आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या कल्पनांना पाठबळ देणार असून याला केंद्र शासनाचीही मदत लाभणार आहे. यात महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. यावेळी कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.